मुदब्बीर शेखच्या अटकेनंतर कुटुंब बेपत्ता
मुंब्य्रातील अमृतनगरमधील रेश्मा इमारत.. याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मुदब्बीर शेख हा कुटुंबासोबत राहतो.. तो आणि त्याचे कुटुंब इमारतीमधील रहिवाशांशी फारसे मिसळत नव्हते.. दिवसातून पाच वेळा नमाज अदा आणि चार वर्षांच्या मुलीला शाळेतून ने-आण करण्यापुरताच तो घराबाहेर पडायचा. यामुळे गेल्या चार वर्षांपासून तो या ठिकाणी राहत असला तरी त्याचा इतर रहिवाशांसोबत फारसा संबंध नव्हता. ठाणे दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईनंतर त्याचे कुटुंब घराला कुलूप लावून बेपत्ता झाले आहे. विशेष म्हणजे, शेख कुटुंबाविषयी त्यांच्या शेजाऱ्यांना आणि इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनाही फारशी माहिती नाही आणि या कारवाईमुळे संपूर्ण इमारतीमध्ये आणि परिसरात शुकशुकाट पसरल्याचे चित्र दिवसभर होते.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ४०४ क्रमांकाच्या खोलीत हे कुटुंब राहते. पत्नी उजमा आणि दोन मुलींसोबत मुदब्बीर येथे राहतो. मोठी मुलगी चार वर्षांची असून तिचे नाव नायफा आहे, तर त्याच्या लहान मुलीचा काही महिन्यांपूर्वीच जन्म झाला आहे. पदवीधर असलेल्या मुदब्बीर याने संगणकासंबंधीचे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. यापूर्वी तो नालासोपारा परिसरात राहायचा. चार वर्षांपूर्वी तो वास्तव्यासाठी मुंब्रा येथे आला होता. तसेच दोन वर्षांपूर्वी तो गोरेगाव परिसरातील एका कंपनीत काम करीत होता. या कंपनीत तो संगणकाचे कामकाज पाहायचा. मात्र, मुंब्य्रात वास्तव्यासाठी आल्यामुळे गोरेगावचा लांबचा प्रवास त्याला दररोज शक्य होत नव्हता. यामुळे त्याने कामावर जाणे बंद केले आणि घरामधूनच संगणकाचे काम सुरू केले. दिवसातील सर्वाधिक वेळ तो संगणकावरच काहीतरी काम करायचा. गेल्या चार वर्षांपासून तो शेजाऱ्यांशी फारसा बोलत नव्हता. त्याची पत्नी आणि चार वर्षांची मुलगी या दोघीही घराबाहेर फारश्या पडत नव्हत्या आणि इमारतीमधील इतर महिला रहिवाशांसोबत मिसळत नव्हत्या. इमारतीच्या देखभाल खर्चाची रक्कम देण्यासाठी तो किंवा त्याची पत्नी इमारतीच्या पदाधिकाऱ्यांकडे जायची. कामापुरती थोडीफार बातचीत. त्या पलीकडे मात्र त्यांचे इमारतीच्या पदाधिकाऱ्यांशी फारसे बोलणे होत नव्हते, असे इमारतीमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
हे कुटुंब इमारतीमधील रहिवाशांमध्ये मिसळत नव्हते, यामुळे या कुटुंबाविषयी फारशी माहिती आमच्याकडे नाही, असे इमारतीमधील रहिवाशांकडून सांगण्यात आले. ठाणे दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईनंतर त्याचे कुटुंब घराला कुलूप लावून बेपत्ता झाले आहे.
हे कुटुंब कुठे आहे, याविषयी इमारतीमध्ये कुणालाच माहिती नाही. अमृतनगर परिसरात त्याचे सासरे राहत असून ते याप्रकरणी बोलण्यास पुढे येत नव्हते.
मुंब्यात २६ जानेवारीला रॅली
पठाणकोट हल्ल्याचा तसेच आयसिसच्या निषेधार्थ २६ जानेवारीला मुंब्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शांतता रॅली काढण्यात येणार असल्याचे येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा