बदलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बुधवार आणि गुरूवार अशा दोन दिवशी शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छता प्रक्रियेमुळेच सुरूवातीला गढूळ पाणी येत असल्याचा दावा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये गोळीबार करणाऱ्या तरूणास शहाडमधून अटक; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
बदलापूर शहराला उल्हास नदीवर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. येथे असलेल्या प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील विविध जलकुंभांमध्ये पुरवले जाते. येथून शहराच्या विविध भागात ते पाठवले जाते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. माती मिश्रीत असल्यासारखे हे पाणी असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पाण्यामुळे रोगराई आणि विकार पसरल्याची भीतीही व्यक्त होत आहे. याबाबत जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर कार्यालयाशी संपर्क केला असता, नुकतेच मुख्य जलकुंभांची सफाई करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठा जसजसा सुरळीत होईल तसतसा हे पाण्याचे प्रमाण कमी होईल असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र या गढूळ पाण्यामुळे नागरिकांत मात्र संतापाचे वातावरण आहे.