नाशिक येथे वर्षभर कुंभमेळा आहे. या कालावधीत सिंहस्थ असल्याने दोन वर्षे लग्नाचे मुहूर्त नाहीत, अशी आवई समाजमाध्यमांतून उठवली जात आहे. त्यामुळे अनेक विवाहेच्छुकांच्या मनात संशय दाटला आहे. सिंहस्थ पर्वातही लग्नाचे मुहूर्त आहेत, अशी माहिती ज्योतिषशास्त्री विद्याधर करंदीकर यांनी दिली.
१४ जुलै २०१५ ते ११ ऑगस्ट २०१६ या कालावधीत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा सुरू राहणार आहे. या काळाला सिंहस्थ असे म्हणतात. या काळात विवाहासाठीचे मुहूर्त नाहीत, असा प्रसार केला जात आहे, पण तसेच नाही. कुंभमेळा सुरू झाल्यानंतर ३० सप्टेंबर नंतर विवाहाचे मुहूर्त आहेत. काही पंचागकर्ते चातुर्मासात विवाहाचे मुहूर्त देतात, तर काही त्या नंतरच्या मासात विवाहाचे मुहूर्त देतात. गंगा, गोदावरी तटांमधील मधल्या प्रदेशातील बंगाल, गुजरात, कलिंग भागात मात्र सिंहस्थामध्ये कोणतेही मंगलकार्य केले जात नाही. ही पुरातन पद्धत आहे. मुंज, लग्न आणि वास्तुशांती या कार्याचा फक्त त्यास अपवाद आहे, असे करंदीकर शास्त्रींनी सांगितले. भारतात अशी मंगलकार्य करण्यास कोणताही अडथळा नाही. अपप्रचाराला महत्त्व देऊ नका, असे ते म्हणाले.
सिंहस्थ म्हणजे काय?
सिंहस्थ म्हणजे गुरू ग्रहाचा सिंह राशीत होणारा प्रवेश. या प्रवेशाला सिंहस्थ म्हणतात. या काळात टप्प्याने नाशिक, प्रयाग, उज्जन, अलहाबाद या ठिकाणी कुंभमेळा भरतात. गुरूचे सिंह राशीतून निर्गमन झाले की कुंभमेळ्याची समाप्ती होते. सिंहस्थ पर्वात लग्न मुहूर्त आणि धार्मिक कार्य का नसतात. पूर्वी कुंभमेळ्याला जाण्यासाठी प्रवासाची साधने नव्हती. त्यामुळे यापूर्वी पंडित, शास्त्री, पुरोहित मंडळी कुंभमेळ्याला जाण्यासाठी पायी प्रवास करायचे. या प्रवासात त्यांचे एक ते दोन महिने जायचे. तेथील वास्तव्य साधारणत: एक ते दीड महिना असायचे. विविध भागांतून पुरोहित वर्ग कुंभमेळ्याला गेल्याने स्थानिक भागात धार्मिक कार्यालयाला पुरोहित उपलब्ध होत नसत. त्यामुळे स्थानिक पातळीवर धार्मिक कार्य होत नसत. हाच जुना पायंडा पुढे पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा