|| सुहास बिऱ्हाडे
गुन्हेगारी, गैरकृत्य रोखण्यासाठी पोलिसांचा अनोखा प्रयोग
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुन्हेगारी, दरोडे, चोरटी वाहतूक आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी आता बुलेटमधून गस्त घालण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. प्रथमच हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. तलासरीपासून घोडबंदपर्यंतच्या महामार्गावर २४ तास गस्त घालण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पालघर जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा १२० किलोमीटरचा भाग पालघर जिल्ह्यातून जातो. तलासरी ते घोडबंदपर्यंत हा संपूर्ण महामार्ग आहे. या महामार्गावर अनेक गुन्हेगारी कारवाया होत असतात. वाहनांना लुटणे, दरोडे, निर्जन जागा असल्याने हत्या करणे, मृतदेह आणून टाकणे असे प्रकार होत असतात. महामार्गावरूनच परराज्यातून बंदी असलेला गुटखा आणला जातो, तर उत्पादन शुल्क चुकवून मद्य आणले जाते. महामार्गालगतच्या जंगलातून हातभट्टय़ांची बनावट दारू बनवून आणली जाते. इतर अनेक गैरप्रकार या महामार्गावर होत असतात. पोलिसांना हे गैरप्रकार आणि अनधिकृत कारवाया रोखण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे आता महामार्गावर २४ तास बुलेट या दुचाकीने गस्त घालण्याची योजना पोलिसांनी बनवली आहे. वसईतील पोलीस ठाण्यांना २० ते २५ बुलेट देऊन ही गस्त घातली जाणार आहे त्यासाठी बुलेट घेऊन ती विशिष्ट पद्धतीने तयार केली जाणार आहे.
२४ तास बुलेटने गस्त घालून महामार्ग सील केले जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अनेकदा गुन्हेगार गुन्हे करून महामार्गावरून पळून जातात. महामार्गावर सतत पोलीस असल्याने या गुन्हेगारांना पकडणे सोपे होणार आहे. महामार्गावर एरवी लक्ष देणे कठीण जात होते. अनेक मृतदेह महामार्गालगत सापडत होते, दरोडय़ाच्या घटना वाढल्या होत्या. बुलेटने गस्त घातल्यानंतर याला आळा बसेल, असा विश्वास पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी व्यक्त केला. पोलीस महासंचालकांकडे बुलेट खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काही बुलेट या कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून घेतल्या जातील. त्यांची आधुनिक रचना करून नंतर या बुलेटची गस्त सुरू केली जाणार असल्याचेही सिंग यांनी सांगितले.
बुलेटची वैशिष्टय़े
- एका बुलेटवर दोन शस्त्रधारी पोलीस असतील.
- पोलिसांची बुलेट म्हणून तिला विशिष्ट रंग आणि दिवे बसवले जाणार आहेत.
- १२-१२ तासांच्या पाळीत प्रत्येक बुलेटचे पोलीस महामार्गावर गस्त घालणार आहे.
- प्रत्येकाला ३० ते ३५ किलोमीटरचा महामार्गाचा परिसर दिला जाणार आहे.
- या बुलेटना जीपीएस प्रणाली लावून ती नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहे. त्यामुळे गस्त कुठे कुठे सुरू आहे ते वरिष्ठांना पाहता येणार आहे.
महामार्गावर पोलीस नसल्याने अनेक बेकायदा आणि अनैतिक गोष्टी घडत असतात. त्याला यामुळे लगाम बसेल. प्रथमच अशा प्रकराची गस्त सुरू होणार असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यच्या सीमा सुरक्षित राहतील. गुन्हे आणि बेकायदा कृत्यांना आळा बसेल. – गौरव सिंग, पोलीस अधीक्षक, पालघर