महामार्ग परिसर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेला हा परिसर आहे. काजूपाडा, चेणा या आदिवासी भागापासून ते दहिसर चेकनाका भागातील बहुमजली इमारती असा विरोधाभास असलेला भाग या परिसरात मोडतो.

या परिसराचा एक भाग ठाणे महानगरपालिकेला जोडलेला आहे, दुसरा वसई विरार आणि तिसरा भाग मुंबई महानगरपालिकेला जोडला गेला आहे. पूर्व भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द आहे. महामार्गाला लगत असल्याने या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक होते. मात्र हा परिसर तसा दुर्लक्षितच राहिला आहे. चेणा, वसरेवा, माशाचा पाडा, मीनाक्षी नगर, लक्ष्मी बाग, दाचकुल पाडा, मीरा गावठाण या भागात आदिवासी आणि स्थानिक ग्रामस्थांची घरे आहेत. पेणकर पाडा, मीरा गाव या भागात आगरी समाज तसेच काशी गावात मुस्लीम धर्मीय राहतात. दहिसर चेकनाका, पेणकर पाडा आणि मीरा गाव या भागात आता टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या असल्याने धनिक समाजाची संख्याही या ठिकाणी वाढू लागली आहे.

काही महिन्यांपूर्वी महामार्ग परिसर ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने ओळखला जात असे. मुंबईला अगदी लागून असल्याने तसेच मुंबईत व्यापारानिमित्त येणाऱ्यांचा सतत राबता असल्याने येथील ऑर्केस्ट्रा बार कायम तुडुंब भरलेले असत. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकही या बारमधून नियमितपणे येत असत. शिवाय बार संलग्नच लॉज बांधण्यात आली असल्याने वेश्याव्यवसायासारखी अनैतिक प्रवृत्तीदेखील या ठिकाणी फोफावली होती. त्यामुळे हे बार स्थानिकांची डोकेदुखी तर ठरतच होते शिवाय स्थानिक पोलिसांनाही ते आव्हान ठरत होते. मात्र महामार्गालगत ५०० मीटपर्यंत मद्यविक्रीस सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे एका रात्रीत हा परिसर शांत झाला. इथली बारसंस्कृती ठप्प झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

महामार्गालगत पूर्वी अनेक छोटे-मोठे कारखाने होते. परंतु यातील अनेक कारखाने बंद पडल्याने त्यांचे आता चित्रीकरणाच्या स्टुडिओमध्ये रूपांतर झाले आहे. मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपटांचे चित्रीकरण या स्टुडिओमधून होत असते. फार पूर्वी चेणा गावात असलेला वेलकर हा ओपन स्टुडिओ अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ओळखला जात होता. घोडबंदर गावातील किल्ल्यातही अनेक चित्रीकरणे पार पडली आहेत.

या भागातील राजकीय समीकरण तसे संतुलित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे जवळपास एकसमान वर्चस्व या भागात होते, भाजपनेही आपले अस्तित्व या ठिकाणी निर्माण केले होते. परंतु यात आता बदल झाला आहे. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक शिवसेनेत सामील झाले आहेत तर भाजपनेही इतर पक्षातील काही नेत्यांना पक्षात घेऊन आपले सामथ्र्य वाढवले आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

आदिवासी भागाचा काही परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट होत असल्याने या भागात विकास कामे होऊ शकलेली नाहीत. काही भागात स्मशानभूमीदेखील नसल्याने मृतांवर उघडय़ावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. दाचकुल पाडा भागात आजही पिण्याच्या पाण्याची वाहिनी टाकण्यात आलेली नाही. महापालिका या ठिकाणी टँकरने पाणी पुरवते तसेच स्थानिकांना बोअिरगच्या दूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागते. माशाचा पाडा, मीनाक्षी नगर या ठिकाणी झालेल्या अनधिकृत झोपडय़ा हीदेखील मोठी समस्या आहे. शिवाय दहिसर चेकनाक्याजवळ कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने दररोज प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सोसावा लागत असतो.

  • या परिसरात १४, १५ आणि १६ हे प्रभाग येतात.
  • मतदारांची संख्या – ६८,६१०
  • पुरुष मतदार – ३८,६३६
  • स्त्री मतदार – २९,९७३
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ahmedabad highway ban on bar