ठाणे : मुंब्रा येथील मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेला भुखंड मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेला दहा वर्षांकरीता एक रुपया नाममात्र भाडेपट्टयावर देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला असून या संबंधीच्या प्रस्तावाला ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेने नुकतीच मान्यता दिली आहे. दहा वर्षांसाठी करार करण्यात येणार असला तरी पहिल्या पाच वर्षांची कामगिरी पाहून पुढील पाच वर्षांचा करार वाढविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ठाणे, मुंब्रा, शीळ, कौसा भागातील खेळाडूंंना क्रिकेट प्रशिक्षणाची सुविधा मिळणार असून त्यांना प्रशिक्षणासाठी मुंबईत जावे लागणार नसल्याने खेळाडूंसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने प्रस्तावात केला आहे.

ठाणे महापालिकेची मुंब्रा येथे सर्व्हे क्रमांक ४८ पैकी, ४९ पैकी, ५० अ पैकी, ११९ अ पैकी, १२१ पैकी हा भुखंड मनोरंजन मैदानासाठी आरक्षित आहे. या भुखंडाचे क्षेत्रफळ १७६९३.९७ चौरस मीटर इतके असून ही जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यात आहे. हा भुखंडावर कोणतेही बांधकाम नसून हा भुखंड मोकळा आहे. हा भुखंड क्रिकेट प्रशिक्षण, शिबिरे उपक्रम, प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे आणि या सुविधा ना नफा ना तोटा या तत्वावर नागरीकांना उपलब्ध करुन देणे, या प्रयोजनार्थ दिर्घमुदतीसाठी भाडेपट्टावर उपलब्ध करून देणेबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेने ठाणे महापालिकेकडे विनंती केली होती. या विनंतीचा विचार करून ही जागा त्यांना देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ठाणे शहर हे क्रीडेचे व्यासपिठ आहे. क्रीडा विषयक बाल वयापासून मुले आणि मुली यांच्यामध्ये आवड असते. तसेच आरोग्याच्या दृष्टीने खेळ चांगले आहेत. खेळात प्राविण्य मिळविल्याने खेळाडूंना शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे हे प्रयोजन ठाणे, मुंब्रा-शिळ-कौसा येथील खेळाडूंना फायदेशीर ठरेल. तसेच हा उपक्रम ठाण्यात सुरु झाल्यास खेळाडूंना मुंबई येथे जावे लागणार नाही. त्यांचा प्रवास व वेळ वाचेल. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनला जागा देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे प्रस्तावात स्पष्ट केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन हि संस्था ना नफा ना तोटा या धर्तीवर हा प्रकल्प राबविणार असून ते कोणत्याही प्रकारे शुल्क न आकारता ठाणेकरांसाठी सुविधा उपलब्ध करणार आहेत. तसेच या जागेची आणि त्यामधील प्रकल्पाची निगा देखभाल, इतर सर्व खर्चही संस्था करणार आहे. त्याकरिता ठाणे महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही, असेही पालिकेने प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

रेडी रेकनरच्या दरानुसार भाडे आकारणी

ठाणे महानगरपालिकेने क्रीडा प्रयोजनाकरिता दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथील वाणिज्य गाळे विविध खेळ संघटना ज्याप्रमाणे १ रुपये मासिक भाडे आकारुन दिर्घ कालावधीकरिता भाडेतत्वावर दिले आहेत. त्याच धर्तीवर मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेस मुंब्रा येथील मनोरंजन मैदान करिता आरक्षित असलेला भूखंड महापालिकेच्या स्थावर मालमत्तेचे भाडेपट्टयाने हस्तांतरीत करणे, भाडेपट्टयाचे नुतनीकरण करणे असा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नगर विकास विभाग महारष्ट्र शासन राजपत्र दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ च्या अधिसुचनेमधील अटी व शर्तीनुसार महापालिका स्वतःची मालमत्ता प्रथमतः दहा वर्षापर्यंत भाडेपट्टाधारकास मासिक भाडे आकारुन देणार आहे. परंतु या १० वर्षामध्ये प्रथम ५ वर्षात सदर भाडेपट्टाधारकाकडून ज्या प्रयोजनासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे, त्याबाबत संस्थेची समाधानकारक कामगिरी विचारात घेऊन उर्वरीत ५ वर्षाकरिता भाडेपट्टा कालावधी वाढवून देण्यात येणार आहे. संस्थेने या जागेचा वापर हा व्यावसायीक तत्वावर केला आहे असे निदर्शनास आल्यास, या संस्थेस उपरोक्त जागेच्या वापराकरीता रेडी रेकनरच्या दरानुसार भाडे आकारण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यास समितीने शिफारस केलेली आहे, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.

अटी व शर्ती

या जागेतील मैदानाची निगा देखभाल करण्याची व स्वच्छता ठेवणेची संपूर्ण जबाबदारी ठेकेदार संस्थेची राहील. जागा चांगल्या स्थितीत ठेवुन त्याची सर्व देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबधीत संस्थेस घ्यावी लागेल. या मैदानाची जागा ठाणे महापालिकेची असून हे मैदान सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधीत ठेकेदारासंस्थेची असेल. पाणी आणि वीज जोडणी ठाणे महापालिकेमार्फत देण्यात येईल. त्याची बिले देकारासोबत ठेकेदार संस्थेने भरणे बंधनकारक राहील. तसेच संस्थेने पाणी व विजेचा वापर हा आवश्यकतेनुसार करावयाचा असून अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. सदर देयके ठेकेदार संस्थेच्या नावे करता येणार नाहीत. सदर मैदान मोकळे असून त्याठिकाणी कोणतीही वास्तू नाही. याठिकाणी कोणतीही वास्तू (कार्यालय, स्वच्छता गृह, स्टोअर रुम, बैठक रूम, वेटींग रूम, खेळाडू निवास व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादी) आवश्यक असल्यास याबाबत नकाशे तयार करून ठाणे महापालिकेची पूर्व परवानगी घेऊनच बांधकाम करण्यात यावे. याकामी महापालिका कोणताही खर्च करणार नाही. इतर आवश्यक विभागाच्या मंजुरी आणि परवानग्या संस्थेने घेणे आवश्यक आहे. सदर भाडे तत्वावरील जागेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन प्रकरणात किंवा मागण्या किंवा न्यायालयीन दाव्याबाबत महापालिका जबाबदार राहणार नाही. निष्काळजीपणापुळे एखादी दुर्घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधीत संस्था राहील आणि होणारी नुकसान भरपाई द्यावी लागेल. सी.सी. टि व्ही यंत्रणा बसविण्याची जबाबदारी संस्थेची असेल. या संस्थेने ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील क्रिकेट खेळाडूंना प्रशिक्षण देणकरीता प्राधान्य देणे बंधनकारक राहील. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील शिफारस केलेल्या इच्छुक २० खेळाडूंस विनामुल्य प्रशिक्षण देणे संस्थेस बंधनकारक राहील, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.

Story img Loader