वर्षांनुवर्षे विरोधी पक्षात राहूनही स्थानिक पातळीवर आंदोलनांच्या माध्यमातून स्व:पक्षाचा अपेक्षित दबदबा निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत नवी मुंबई शहराच्या विकासाची गाथा मतदारांपुढे मांडण्यास सुरुवात केली आहे. अतिशय प्रतिकूल वातावरण असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निसटता का होईना विजय मिळवला. हे लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवलीच्या प्रचारात नवी मुंबईच्या विकासासारखे स्वप्न राष्ट्रवादीकडून दाखविले जात असून ‘सत्ता द्या, नवी मुंबईसारखा विकास करू’, असे आश्वासन या पक्षाकडून दिले जात आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे अध्र्याहून अधिक नगरसेवक यंदा शिवसेना आणि भाजपमध्ये गेले आहेत. राष्ट्रवादीतील मातब्बर पक्षातून बाहेर पडल्याने यंदा निवडणूक लढवायची कशी, असा पेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला होता. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला दहा दिवस शिल्लक असूनही या पक्षाचे वरिष्ठ नेते अद्याप कल्याणात फिरकलेले नाहीत. या पाश्र्वभूमीवर प्रचाराचे नेमके स्वरूप कसे असावे याविषयी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात कमालीचा संभ्रम असून यावर उतारा म्हणून राष्ट्रवादीने नवी मुंबईचा आधार घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे.

उमेदवारांची दमछाक

नवी मुंबई हे शहर नियोजित असल्याने या शहराच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली शहरांचा विकास करू म्हणजे नेमके काय करू हे सांगताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मात्र दमछाक होते. नवी मुंबईतील रस्त्यांची रुंद आखणी, मोकळ्या जागा, अतिक्रमणमुक्त मैदाने-उद्याने असा निश्चित आराखडा ठरला आहे. कल्याण-डोंबिवलीसारख्या नियोजनाच्या आघाडीवर विस्कटलेल्या शहरांत हा आराखडा शक्य आहे का, असा सवाल एका ज्येष्ठ नियोजनकर्त्यांनी ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला.

 

Story img Loader