कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातून मुंबईतील शासन, मुंंबई पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक आणि इतर रुग्णालयांमध्ये गंभीर, सामान्य रुग्ण पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाप्रकारे रुग्ण पाठवत असाल तर त्या रुग्णाच्या सोबत कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयाने एक डाॅक्टर, परिचारका सोबत पाठवावी, अशी सूचना मुंबईतील पालिका,शासकीय रुग्णालयांनी कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालय प्रशासनाला केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मुंबई पालिकेच्या, शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी असते. तेथील बाह्य रुग्ण, अत्यावश्यक सेवा, अपघात, प्रसूती विभाग आणि इतर रुग्ण सेवा विभाग रुग्णांनी भरलेले असतात. हे रुग्ण तपासताना स्थानिक डाॅक्टरांवर प्रचंड भार असतो. त्यांना योग्य औषधोपचार, दाखल करून घेण्याची प्रक्रिया या सगळ्या धावपळीत मुंबईतील रुग्णालयांतील डाॅक्टर, परिचारिका व्यस्त असतात.
कल्याण डोंबिवली पालिकेची कल्याणमध्ये रुक्मिणीबाई, डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय आहे. २५ आरोग्य केंद्रे आहेत. पालिकेच्या या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डाॅक्टरांची कमी आहे. आरोग्य सेवेत महत्वाची भूमिका बजावणारे सहा ते सात डाॅक्टर आरोग्य केंद्रे, रुग्णालये सोडून कल्याणमधील पालिका मुख्यालयात प्रशासकीय, निविदा प्रक्रिया अशा कामात व्यस्त आहेत. पालिकेच्या रुग्णालयात प्रसृती, सिझेरिन, गंभीर जखमी, अतिशय अत्यवस्थ रुग्ण दिवसा, रात्री आला तर त्या रुग्णावर प्राथमिक उपचार करून त्या रुग्णाला कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयातून मुंबई शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय किंंवा आवश्यक तातडीच्या उपचाराच्या रुग्णालयात पाठविले जाते.
हा अत्यवस्थ रुग्ण मुंबई नेल्यानंतर त्याच्यावर प्रथम उपचार करायचे की बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण तपासायचे असे प्रश्न मुंबईतील स्थानिक डाॅक्टरांना पडतात. रुग्ण अत्यवस्थ असेल तर त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंतच्या कालावधीत त्या रुग्णावर अत्यावश्यक देखरेख ठेवणे आवश्यक असते. कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालयातून रुग्ण घेऊन गेलेल्या रुग्णवाहिका चालकाने एकदा रुग्ण मुंबईतील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात रुग्ण दिला की ते निघून येतात. मधल्या काळात त्या रुग्णावर देखरेख करण्यासाठी कोणीही नसते. कल्याण, डोंबिवलीतून आणलेल्या रुग्णाला काही झाले तर पुन्हा त्याची उत्तरे स्थानिक डाॅक्टरांना द्यावी लागतात.
कल्याण डोंबिवलीतून मुंबईत पाठविण्यात आलेले अनेक रुग्ण मुंबईतील बाह्य रुग्ण विभागात केलेल्या उपचारानंतर बरे होतात. हे रुग्ण कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालय मुंबईत कशासाठी पाठवते, असे प्रश्न मुंबईतील रुग्णालयातील डाॅक्टरांचे आहेत. कल्याण डोंबिवलीतील पालिका रुग्णालयातून मुंबईतील पालिका, शासकीय रुग्णालयात रुग्ण पाठवायचा असेल तर सोबत एक डाॅक्टर, परिचारिका पाठवावी, अशा सूचना मुंबईतील रुग्णालयांनी पालिकेला केल्या आहेत. कल्याण डोंबिवली पालिका रग्णालयातून साधारण, गंभीर रुग्ण मुंबईत पाठविण्याचे प्रमाण वाढल्याने मुंबईतून अशा सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.अशी काही सूचना नाहीत. फक्त रुग्ण अति गंभीर असेल तर त्याला रुग्णवाहिकेतून वाटेत लागलेली वैद्यकीय मदत, रुग्णालयात दाखल करेपर्यंतच्या काळात त्याच्या सोबत कोणी असावे अशी त्यांची सूचना आहे. डाॅ. दीपा शुक्ला वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कडोंमपा.