कल्याण- कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मंगळवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याचे एका लाईनमनला समजले. त्याने ही माहिती तातडीने वरिष्ठांना दिल्यानंतर मुंबईकडून कल्याणकडे येणारी लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक पाऊण तास बंद ठेवण्यात आली. सकाळच्या वेळेत रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला.

रुळाला तडा गेल्याची माहिती वेळीच समजली नसती तर मोठा अपघात याठिकाणी घडला असता, असे रेल्वे सुत्राने सांगितले. लाईनमनच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळल्याने त्या कामगाराचे रेल्वेच्या वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

मंगळवारी सकाळी पत्रीपुला पासून काही अंतरावर रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती याठिकाणी तैनात एका लाईनमनला समजली. त्याने ही माहिती तांत्रिक विभागाच्या वरिष्ठांना दिली. तांत्रिक विभागाचे दुरुस्ती पथक तातडीने घटना स्थळी येऊन त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत सकाळच्या वेळेत पुणे, नाशिक दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस, कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरात खोळंबल्या होत्या.

पाऊण तास एकही लोकल् रेल्वे स्थानकात न आल्याने डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, कोपर, मुंब्रा, ठाणे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. सकाळीच कामावर जाण्याची घाई असलेल्या प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा झाली. रेल्वे स्थानके प्रवाशांनी तुंडुंब भरली असतानाच सकाळी पाऊस आणि घामाच्या धारांनी प्रवासी हैराण झाले होते.

दुरुस्तीचे काम सकाळी सव्वा सात वाजता संपल्यानंतर तातडीने कर्जत, कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत रेल्वेचे लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले होते.