लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ५० किमीहून अधिक लांबीच्या आणि साडेबारा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते प्रकल्पांच्या बांधकामाचा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोकळा केला आहे.

पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण, ठाणे खाडी किनारा मार्ग यासह अन्य प्रकल्पांच्या बांधकामाच्या निविदा एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अंतिम करण्यात आल्या आहेत. अशोका बिल्डकॉन, नवयुग, जे कुमार, अॅफकॉन्स आदी कंपन्यांना प्रकल्पाच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. आता लवकरच पुढील कार्यवाही करून डिसेंबरखेर वा नव्या वर्षाच्या सुरुवातीस ५० किमी लांबीच्या रस्ते प्रकल्पाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- गोराई, चारकोप, मालवणीतील जागतिक बँक प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा

मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रवास अतिवेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. मागील काही वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एमएमआरडीएने विविध प्रकल्प, कामांचा सपाटा लावला आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी साडेबारा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प एमएमआरडीएने राबविण्याचा निर्णय घेतला असून आता लवकरच हे प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागणार आहेत.

आणखी वाचा-मुंबई : कंपनी व्यवस्थापकाची ८८ लाखांची सायबर फसवणूक

प्रकल्पाचा एकूण खर्च २७२७ कोटी

  • ठाणे खाडी किनारा मार्गातील बाळकुम – गायमुख, एनएच ३ कनेक्टर घोडबंदर बायपास रस्त्याच्या कामाचे कंत्राट मे. नवयुग इंजिनीयरिंग कंपनीला मिळाले आहे. हा प्रकल्प १३.४५ किमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा आहे. यापैकी ८.११ किमी लांबीचा पूल उन्नत असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च २७२७ कोटी रुपये आहे.
  • कासारवडवली – खारबाव, भिवंडी खाडी पूल आणि रस्त्याचे कंत्राट मे. अॅफकॉन्सला मिळाले आहे. खाडीपूल ३.९३ किमी लांब आणि ४० मीटर रुंद आहे. हा पूल ठाणे खाडी, बुलेट ट्रेन मार्ग, बहुउद्देशीय मार्गिका ओलांडून पुढे जाणार आहे. या प्रकल्पासाठी १,५२५.३१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • छेडानगर, घाटकोपर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणाचे काम मे. नवयुग इंजिनीयरिंग कंपनीला मिळाले आहे. हा प्रकल्प १२.९५५ किमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा असून हा उन्नत मार्ग असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च २६८२ कोटी रुपये आहे.
  • पूर्व द्रुतगती मार्गावरील आनंद नगर – साकेत उन्नत रस्त्याच्या निविदेत मे. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीने बाजी मारली आहे. हा उन्नत रस्ता ८.२४ किमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा आहे. या प्रकल्पासाठी १८४७.७२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
  • एनएच-४ (जुना) – काटई नाका उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामाचे कंत्राट मे. अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले आहे. हा रस्ता ६.७१ किमी लांबीचा असून बुलेट ट्रेनसह रेल्वे मार्ग ओलांडून जाणारा असा रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी ३० ते ४५ मीटर असून प्रकल्पाचा खर्च १९८१.१७ कोटी रुपये आहे.
  • गायमुख – पायेगाव खाडी पुलाच्या निविदेत मे. अशोका बिल्डकॉनने बाजी मारली आहे. ६.५०९ किमी लांबीच्या या खाडी पुलासाठी ९७५.५८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
  • कोलशेत – काल्हेर खाडी पुलाचे कंत्राट मे. अशोका बिल्डकॉनला मिळाले आहे. हा खाडी पूल १.६४ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचा खर्च २८८.१८ कोटी रुपये आहे.
  • कर्जत, कसारा मार्गावरून कल्याण – मुरबाड रोड ते बदलापूर रोडपर्यंतच्या उन्नत रस्त्याचे काम मे. अशोका बिल्डकॉनला मिळाले आहे. हा उन्नत रस्ता २.१६ किमी लांबीचा असून या रस्त्यासाठी ४५१.१० कोटी रुपये खर्च येणार आहे.
  • ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांअंतर्गत तीन हात नाका येथे पादचारी पुलाचे बांधकाम करण्याचे कामाचे कंत्राट मे. केबीए इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडला मिळाले आहे. यासाठी ६८.०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.