लोकसत्ता, प्रतिनिधी
मुंबईपासून जवळच असलेल्या मीरा रोड या उपनगरातल्या एका हायराईज सोसायटीत कुर्बानीसाठी दोन बकरे आणले गेल्याने राडा झाला आहे. मीरा रोडच्या JP इन्फ्रा या सोसायटीत कुर्बानासाठी दोन बकरे आणले गेल्याने हंगामा झाला. विरोध करणाऱ्यांनी हनुमान चालीसा पठण केलं आणि जय श्रीरामचे नारेही लगावले. जे लोक आंदोलन करत होते त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणात बाचाबाचीही झाली. मात्र पोलिसांनी यामध्ये आंदोलन करणाऱ्यांची समजूत घातली.
नेमकी काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, मोसीन शेख यांनी बकरी ईदच्या कुर्बानीसाठी दोन बकरे जेपी इन्फ्रा या सोसायटीत आणले गेले. याविषयीची माहिती सोसायटीतल्या काही लोकांना मिळाली. त्यानंतर हे सगळेच जण सोसायटीच्या बाहेर जमा झाले. कुर्बानीसाठी आणलेले बकरे बाहेर घेऊन जा अशी मागणी करत आंदोलन सुरु करण्यात आलं. ज्यावेळी विरोध वाढला तेव्हा काहींनी हनुमान चालीसा पठण केलं तसंच जय श्रीरामचे नारेही लगावले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मोठ्या प्रमाणावर तिथे पोहचले. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. यावेळी पोलीस आणि सोसायटीतले रहिवासी यांच्यात काही प्रमाणात बाचाबाचीही झाली.
अवघ्या एका दिवसावर ‘बकरी ईद’ असल्यामुळे या सोसायटीत राहत असलेल्या मोसीन खान या व्यक्तीने आपल्या घरी दोन बकरे आणले. ही माहिती इतर सोसायटी मधील सदस्यांना मिळाली. येत्या बकरी ईद दिवशी सोसायटीमध्येच कुर्बानी दिली जाईल,असा गैरसमज समजून काही लोकांनी इमारती मध्ये प्रवेश करत असतानाच मोसीन व त्यांच्या कुटुंबीयांची परस्पर चौकशी करण्यास सुरुवात केली.यामुळे संतप्त झालेल्या मोसीन यांनी याचा विरोध करून याबाबतची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
पोलीस अधिकाऱ्यांनी सोसायटीच्या लोकांना हे सांगितलं की सोसायटी नियमांच्या अंतर्गत कुठल्याही रहिवासी सोसायटीत कुर्बानी दिली जाऊ शकत नाही. आम्ही असं घडू देणार नाही. जर असं घडलं तर संबंधितांना आम्ही अटक करु. मात्र सोसायटींसाठी असा नियम नाही की कुणी बकरा घरी आणू शकत नाही. तरीही जे काही घडलंय त्यानंतर आम्ही शेख यांना बकरे या ठिकाणाहून घेऊन जाण्यास सांगत आहोत. असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मोसीन शेख यांचं काय म्हणणं आहे?
या प्रकरणी मोसीन शेख यांनी असं म्हटलं आहे की आमच्या सोसायटीत २०० ते २५० मुस्लिम कुटुंबं राहतात. दर वर्षी बकरे ठेवण्यासाठी बिल्डरकडून आम्हाला जागा दिली जाते. या वर्षी ती जागा दिली गेली नाही. आम्हाला सांगण्यात की जागा देऊ शकत नाही. त्यानंतर सोसायटीशी बोला असंही सांगण्यात आलं. आम्ही याविषयी सोसायटीकडे विचारणा केली मात्र सोसायटीनेही आम्हाला बकऱ्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली नाही.
बकरी ईद निमित्त इमारतीमध्ये ‘कुर्बानी’ करणार नसून केवळ काही दिवसासाठी बकरी ठेवण्यासाठी जागा देण्यात यावी,अशी मागणी मोसीन यांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे केली होती.मात्र ही मागणी सोसायटी धारकांनी मान्य केली नसल्यामुळे नाईलाजाने बकरे घरीच ठेवले असल्याचा दावा मोसीम यांनी केला आहे.तर घरामध्ये बकरे आणून ठेवल्यानंतर पुढे काही होऊ शकते असा दावा सोसायटी मधील लोकांकडून केला जात आहे.
मंगळवारी काय घडलं?
मंगळवारी संध्याकाळपासून सोसायटी मध्ये नागरिकांची मोठी गर्दी होऊन वातावरण तापले होते, म्हणून पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सोसायटी सदस्यांनी धार्मिक घोषणाबाजी करून हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात केली.या घटनेची चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाली आहे. त्यामुळे मोसीन यांच्या कुटुंबीयांची बेकायदेशीरपणे अडवणूक करून गोंधळ घालण्यामुळे पोलिसांनी काही सोसायटी मधील लोकांविरोधात दंगल करणे आणि अन्य कलमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली आहे.