उल्हासनगरः बृहन्मुंबई महानगर पालिकेत नोकरी लावतो असे सांगत एका महिलेने दोघांना सुमारे आठ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. त्यासाठी महिलेने बृहन्मुंबई महापालिकेचे कार्यालयीन बनावट शिक्के बनवून खोट्या सह्या करून बनावट नियुक्तीपत्रही संबंधितांना दिले. मात्र हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे कळताच आपली फसवणूक झाल्याने गिरिष पवार या तरूणाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्ररकरणी अंजली राजाराम मुनेश्वर या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महापालिका, रेल्वे विभाग आणि सरकारी कार्यालयात नोकरी देण्याचे अमिष दाखवून अंबरनाथ शहरात यापूर्वी लाखो रूपयांचा गंडा घातल्याची काही प्रकरणे समोर आली होती. त्यानंतरही कोणत्याही जाहिरातीशिवाय आणि खातरजमा न करता त्रयस्त व्यक्तींना पैसे देऊन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरातील कॅम्प चार भागात राहणारे गिरिष निंबा पवार आणि त्यांचे चुलत भाऊ जगदीश पवार या दोघांना अंजली राजाराम मुनेश्वर या महिलेने विजय रामचंद्र धोत्रे उर्फ संदीप बावीस्कर यांच्या मार्फत बृहन्मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवले.

त्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे कार्यालयीन शिक्के बनवून कागदपत्रावर खोट्या सह्या करून बनावट नियुक्ती पत्र तयार केले. हे बनावट नियुक्त पत्र खरे असल्याचे भासवून तक्रारदारांकडून गुगल पेच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांवर 8 लाख रूपये घेतले. मात्र नियुक्तीपत्र बनावट असल्याचे कळताच गिरीष पवार यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अंजली राजाराम मुनेश्वर या महिलेविरूद्ध विठ्ठसवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर नोकरीच्या अमिषावरून सतर्क राहण्याचे आवाहन केले जाते आहे.

Story img Loader