डोंबिवली : मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या डोंबिवलीतील महाराष्ट्रनगर भागात राहत असलेल्या एका ५९ वर्षाच्या सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याला डिजीटल ॲरेस्टची भीती दाखवून तोतया पोलिसाने या महिलेकडून गेल्या महिन्यात ५१ लाख ३५ हजारू रूपये उकळले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे आणि सेवानिवृत्तीची सर्व रक्कम तोतया पोलीस असलेल्या भामट्यांनी लाटल्याचे लक्षात आल्यावर सेवानिवृत्त महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही महिला आपल्या राहत्या घरी एकटीच राहते. त्या मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाल्या आहेत. फसवणूक झालेल्या या सेवानिवृत्त महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की १७ जानेवारी रोजी दुपारी आपणास मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलतो असे सांगत आपल्या व्हाॅटसप क्रमांकावर संपर्क करण्यात आला. आपणास व्हाॅट्सपवर जे छायाचित्र पाठविले आहे. त्या इसमाने तुमच्या बँक खात्यात गैरव्यवहार केले आहेत, असे सांगितले. ते छायाचित्र पाहून आपण त्या इसमाला ओळखत नसल्याचे तक्रारदार महिलेने कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलणाऱ्या इसमाला सांगितले. त्यानंतर त्या तोतया पोलिसाने सेवानिवृत्त महिलेला दृश्यध्वनी चित्रफितीमधून संपर्क साधला. बोलणारा इसम पोलीस वेशात होता.

त्याने तक्रारदार महिलेला तुमच्या नावावर अनेक गु्न्हे दाखल आहेत. पैसे देऊन ही प्रकरणे तुम्हाला मिटवावी लागतील. अन्यथा तुम्हाला अटक होऊ शकते. ज्या इसमाने तुमच्या बँक खात्यात गैरव्यवहार केला आहे. त्या इसमापासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना धोका आहे. इसम पोलीस वेशात बोलत असल्याने महिलेला पोलीस आपल्याशी बोलतो याची खात्री पटली. तोतया पोलिसाने महिलेला दुसऱ्या दिवशी अटक करण्याचे डिजीटल ॲरेस्ट वाॅरस्ट, पैसे पाठवायचा बँक तपशील, न्यायालयाचे समन्स, किती पैसे पाठवायचे त्याची माहिती व्हाॅट्सपवर पाठवली. पैसा भरणा करून झाल्यावर आपल्यावरील सर्व गु्न्हे माफ होतील. तसेच घडत असलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची तोतया पोलिसाने तक्रारदार महिलेला तंबी दिली होती. त्यामुळे महिलेने घडत असलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.

आपल्यावर काहीतरी संकट आले आहे या भीतीने महिलेने कोणालाही काही न सांगता २० लाख, ३१ लाख ३५ हजार अशी दोन टप्प्यात रक्कम आपल्या बँक खात्यामधून आरटीजीएस माध्यमातून तोतया पोलिसाने दिलेल्या बँक खात्यावर पाठवली. ही रक्कम परत करण्याचे आश्वासन तोतया पोलिसाने महिलेला दिले होते.

सर्व रक्कम पाठवून झाल्यावर महिलेने आपल्यावरील गु्न्हे कमी केले का, भरणा केलेले पैसे परत मिळविण्यासाठी तोतया पोलिसाच्या मोबाईल क्रमांकावर सतत संपर्क करण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद महिलेला मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.