ठाणे : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या निर्माणाचे काम ठाणे जिल्ह्यातील कसारा भागात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी लोखंडी तुळई पडून २० कामगारांचा मृत्यू झाला होता. नुकतेच आणखी एका मजूराचा ठेकेदार आणि कंत्राटी कंपनीच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आहे. येथील मजूरांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे मजूर येथील पुलाखाली झोपले असताना एका डम्परने मजूराला चिरडले. या अपघातात अशोक मोहीते (५०) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा अंकुश मोहीते आणि सुमन पवार (६०) हे जखमी झाले आहेत. अपघाताप्रकरणी नवयुगा कंपनीचा पर्यवेक्षक सी. नंदीवर्धन नायडु, मजूर ठेकेदार दिगंबर जगताप आणि डम्पर चालक अरुण महतो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नायडु आण जगताप यांना अटक केली आहे.
कसारा पोलीस ठाण्यात मजुराने दाखल केलेल्या तक्रारी नुसार, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या निर्माणाचे काम कसारा येथील वाशाळा भागात सुरू आहे. त्यासाठी अमरावती भागात राहणारे अशोक मोहीते (५०) हे त्यांच्या कुटुंबासोबत मजूरीसाठी आले होते. महामार्गाच्या निर्माणाचा ठेका नवयुगा कंपनीला देण्यात आला आहे. नवयुगा कंपनीचे नायडू हे पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात. तर मजूरांचा ठेकेदार जगताप आहे. मजूरांना राहण्यासाठी कंपनीने कोणतीही व्यवस्था केली नव्हती. ही बाब मजूरांनी जगताप आणि नायडु यांना निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतरही त्यांनी त्यांच्या निवाऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे नाईलाजाने मजूरांना येथील एका रस्त्याकडेला राहावे लागत होते. येथे दिवाबत्तीची देखील सोय नाही.
२६ मे यादिवशी रात्री ११ वाजता पुलाखाली मजूर झोपले होते. त्याचवेळी अशोक मोहीते, अंकुश मोहीते आणि सुमन पवार यांना एका भरधाव डम्परने धडक दिली. यात तिघेही जखमी झाले. अपघातानंतर डम्पर चालक पळून गेला. या अपघातात अशोक यांचा मृत्यू झाला. अपघाता प्रकरणी नायडु, जगताप आणि डम्पर चालक अरुण महतो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नायडु आणि जगताप यांना अटक केली आहे.