ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका परिसरात शनिवारी दुपारी एका टँकर चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यातच याच मार्गावर काही वाहने बंद पडल्याने खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहन चालकांना अवघ्या १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता. या अपघातांमुळे ठाणे शहरातील अंतर्गत मार्ग, घोडबंदर आणि मुंब्रा रोड परिसरात कोंडी झाली. वाहतुक कोंडी सोडविताना ठाणे पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई नाशिक महामार्गावरून शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ठाण्याहून टँकर नाशिकच्या दिशेने वाहतुक करत होता. हा टँकर खारेगाव परिसरात आला असता, एका भरधाव टँकरने दुचाकी चालकाला धडक दिली. त्यानंतर चालक टँकर रस्त्यात सोडून कळवा पोलीस ठाण्यात गेला. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. घोडबंदर भागातून वाहने मुंबई नाशिक महामार्ग, ठाण्याच्या दिशेने वाहतुक करतात. त्यामुळे घोडबंदर मार्गावरही कापूरबावडी ते चितळसर मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास टँकर चालकाला पोलीस घटनास्थळी घेऊन आले. त्यानंतर त्याने हा टँकर रस्त्यावरून बाजूला केला. परंतु त्याचवेळी काही वाहने देखील महामार्गावर बंद पडली. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली.

वाहतुक कोंडी सोडविताना ठाणे पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे अर्धा ते पाऊण तास लागत होता. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात, म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच यावेळेत परवानगी आहे. त्यानुसार, दुपारी उरण जेएनपीटी येथून सुटलेली अवजड वाहने खारेगाव मार्गे भिवंडी, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करतात. खारेगाव येथील कोंडीचा परिणाम येथील वाहतुकीवरही बसला. दरम्यान, येथील अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.