किशोर कोकणे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा मुंबई-नाशीक महामार्ग पुढील पावसाळ्यापर्यत खड्डेमुक्त व्हावा यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वेगाने कामे केली जात आहेत. या महामार्गावरील माजिवडा ते वडपे भागाच्या रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग आला असून ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे मे २०२४ पर्यत पुर्ण करण्याचे आदेश रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीने या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेत असल्याने ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रशासकीय यंत्रणा या कामाला जुंपण्यात आल्या आहेत.

हे काम ठरविल्याप्रमाणे मे २०२४ पर्यत पुर्ण झाल्यास मुख्य महामार्ग आठ पदरी आणि दोन-दोन मार्गिका सेवा रस्त्यांसाठी तयार होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील महामार्गावरील खड्डयांमुळे होणाऱ्या कोंडीतून चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे असले तरी येथील साकेत, खारेगाव, वडपे उड्डाणपूल आणि पिंपळनेर येथील रेल्वे पूलाच्या कामासाठी सप्टेंबरचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. मुबई नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो वाहने नाशिक, मुंबई, ठाणे, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करतात. उरण जेएनपीटी येथून सुटणारी अवजड वाहने देखील नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. वाहनांच्या रहदारीच्या तुलनेत हा महामार्ग अत्यंत अरूंद आहे. त्यामुळे दररोज वाहन चालकांना या मार्गावर कोंडीचा सामना सहन करावा लागत असतो. हा महामार्ग पूर्वी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित होता. दर तीन वर्षांनी या रस्त्याच्या दुरूस्ती करणे आवश्यक असते. परंतु प्राधिकरणाकडून दुरूस्ती झाली नसल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.

आणखी वाचा- मुदत उलटूनही बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म अपूर्णच, ऑक्टोबर अखेरीस काम पूर्ण होणे होते अपेक्षित

पावसाळ्यात या महामार्गावर मोठे खड्डे पडत होते. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागत होत्या. या वाहतुक कोंडीमुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी शहरात कोंडी होत होती. भविष्यात या मार्गाला समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा भार या मार्गावर येणार होता. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या मार्गावरील माजिवडा ते वडपे हा २३ किमी रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळा मार्फत २०२१ मध्ये या कामासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सूचना दिल्यानंतर आता या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी वेग आला आहे.

कामाला वेग, पुर्ततेचे आव्हान

या महामार्गावरील मुख्य मार्ग तयार होणार असला तरी साकेत पूल, खारेगाव पूल, पिपंळनेर जवळील रेल्वे पूल आणि वडपे येथील उड्डाणपूलाचे काम पूर्ण होण्यास सप्टेंबर २०२४ उजाडणार आहे. यातील साकेत पूलाच्या रुंदीकरणाचे काम ५५ टक्के पूर्ण झाले आहे. खारेगाव पूलाचे काम ३९ टक्के, रेल्वे पूलाचे काम २० टक्के आणि वडपे येथील उजाडणार आहे. येथील काम रस्त्याच्या तुलनेत काहीसे कठीण स्वरूपाचे आहे. हे कामही वेगाने पुर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

महामार्गावरील माजिवडा ते वडपे महामार्गाचा काही भाग अत्यंत अरूंद आहे. काम पूर्ण झाल्यास हा महामार्ग चार-चार असा आठ पदरी होणार आहे. तर सेवा रस्ते प्रत्येकी दोन-दोन पदरी असणार आहे. ग्रामस्थ किंवा अंतर्गत प्रवासासाठी या सेवा रस्त्यांचा वापर करता येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai nashik highway on the way to pathole free instructions to complete the work till monsoon mrj