राज्यंभरात आठ शहरांमध्ये घर उभारणीसाठी यूएलसीची जमीन देण्याचा निर्णय
मुंबई, ठाण्यासह राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये मोठय़ा संख्येने परवडणारी घरे उभारण्यासाठी राज्य सरकारने कमाल जमीन धारणा कायद्याच्या (यूएलसी) माध्यमातून मिळालेली शेकडो एकर जमीन खुली करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणास (म्हाडा) ही जमीन हस्तांतरित केली जाणार असून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या शहरांमध्ये म्हाडाच्या माध्यमातून हजारो घरांच्या उभारणीचा ढोबळ आराखडा तयार करण्यात आला आहे.
यूएलसीची जमीन राज्य सरकार यापूर्वी महापालिका, मुंबई महानगर विकास प्राधिकरण तसेच म्हाडाला विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी मागणीनुसार देत असे.
या वेळी प्रथमच घर उभारणीसाठी ही जमीन राज्यभर म्हाडाला देण्याचा निर्णय सरकारने घेण्यात आला आहे.
२००८ च्या जमीन वितरण र्सवकष धोरणानुसार नागरी कमाल जमीन धारणा कायद्याच्या माध्यमातून शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनींपैकी चार हजार किंवा त्यापेक्षा अधिक चौरस मीटर क्षेत्रफळाची निवासी जमीन महापालिका, एमएमआरडीए किंवा म्हाडा यांनी विविध प्रकल्पांसाठी मागितल्यास हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. इतर शहरांमध्येही म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची उभारणी केली जाईल, अशी घोषणा मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
कमाल जमीन धारणा कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकारला मिळालेली अतिरिक्त जमीन केवळ ठरावीक प्रकल्पांपुरती मर्यादित न ठेवता ती म्हाडाच्या माध्यमातून घर उभारणीसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा