मुंबईशहरासहीत ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवलीमध्ये सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. ठाणे आणि नवी मुंबई पट्ट्यामध्ये वीजांच्या कडकडाटासहीत जोरदार पाऊस दुपारी दीडपासून सुरु झाल्याचं चित्र पहायला मिळालं. डोंबिवलीमध्ये सकाळपासून ९४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक (पश्चिम विभाग) कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. दुपारी अडीच वाजताच्या अंदाजानुसार मुंबईसहीत उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणे, नवी मुंबई, मध्य मुंबईबरोबरच पूर्व उपनगरांमध्ये पुढील एका तासामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दादर, एलफिस्टनसारख्या भागांमध्ये पाणी साचू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.