ठाणे : मुंबई- गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, या मार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी दिल्याची माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड यांचा या आमदारांत समावेश होता. या सर्वानी कोकणातील प्रवाशांसाठीचे विविध मुद्दे मांडले. कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी केली. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून या मार्गाची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले. 

मुंब्रा स्थानकाच्या नामकरणाविषयी..

मुंब्रा स्थानकाचे नाव मुंब्रादेवी करण्याची विनंती आमदार निरंजन डावखरे यांनी केली. त्यावर रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारडून प्रस्ताव आल्यानंतर योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले.

आमदारांच्या मागण्या

‘वन प्रॉडक्ट, वन स्टॉल’ या प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती किंवा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असावा, कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील फलाट आणि गाडीमधील उंची समान ठेवावी, रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी, सावंतवाडी-दिवा ट्रेन दादपर्यंत न्यावी, रेल्वेमार्गालगत वसलेल्या घरांमधील रहिवाशांचे एसआरए प्रकल्पात पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे जमिनीचा एफएसआय द्यावा, लोटे परशुरामसह विविध एमआयडीसी ते रेल्वेस्थानकापर्यंत रेल्वे मार्गासाठी प्रस्ताव तयार करावा, वीर ते रानवाडी स्थानकापर्यंत दुहेरीकरण करावे, जनशताब्दी, तेजस आणि गरीब रथ गाडय़ांना खेड रेल्वे स्थानकाचा थांबा द्यावा, अशा मागण्याही आमदारांनी केल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai to goa vande bharat express soon minister state railways danve assured mlas ysh