Mumbai Weather Alert : कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात सोमवारी (१३ मे) दुपारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. डोंबिवली आणि कल्याण भागात दुपारपासून आभाळ आलं होतं. त्यापाठोपाठ वादळाला सुरुवात झाली. अर्धा-पाऊण तासाच्या वादळानंतर रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाली. अंबरनाथ आणि बदलापूर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारादेखील पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सलग तीन तास आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे भर दुपारी सायंकाळ झाल्याचा अनुभव येत होता. दुसऱ्या बाजूला या पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. डोंबिवली, कल्याण भागात अनेक ठिकाणी वीज नसल्यामुळे लोकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी दुपारनंतर आभाळ आलं होतं. त्यापाठोपाठ वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुपारी दोननंतर आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे पाऊस बरसणार असल्याची चाहूल लागली होती. वातावरण पाहून अनेकांनी घराची वाट धरली. कारण या उन्हाळ्यात कोणाकडे छत्री असण्याचा प्रश्नच नव्हता. दरम्यान, दुपारी ताशी १०० किमी वेगाने वादळी वारा वाहत होता. त्यामुळे धूळ आणि कचरा लोकांच्या घरात गेला.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, अजून काही वेळ ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारा वाहत राहील. कल्याण-डोंबिवली भागात मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. पुढील तीन ते चार तास घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाने केलं आहे.

दुसऱ्या बाजूला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल सुरळीत चाललेली नाही, याचा मुंबई उपनगरात आणि कल्याण-डोंबवली, कर्जत-कसारा भागात राहणाऱ्या चाकरमान्यांना फटका बसत आहे. ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या डोंबिवली, कल्याणमधील प्रवाशांना बसला. घामाच्या धारांनी अगोदरच हैराण झालेले प्रवासी, त्यात लोकल उशिरा धावत असल्याचे ऐकून संतप्त झाले. सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाली असली तरी लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यामुळे चाकरमान्यांना घरी पोहोचण्यााठी मोठा मनःस्ताप सहन करावा लागतोय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai weather update heavy rain with gusty wind in kalyan dombivli and thane district asc