ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्ग, साकेत पूल आणि खारेगाव टोलनाका या भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे मंगळवारी मुंब्रा बाह्यळण ठप्प झाला आहे. त्यामुळे खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्ग ते शिळफाटा पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अवघ्या पाच ते १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी चालकांना दोन तास लागत आहेत. अवजड वाहनांमुळे दुपारी वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी नव्याने एक संदेश नागरिकांसाठी ट्विटरद्वारे प्रसारित केला. त्यामध्ये मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून वाहतूक करणे टाळून महापे-मुंबई मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
साकेत पूलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. मंगळवारीही सकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग ठप्प झाला आहे. येथील मार्गावर साकेत पूल ते शिळफाटा येथील भांडार्ली पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी नागरिकांना सूचना ट्विटरद्वारे काढली आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्ग, साकेत पूल भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांनी महापे -मुंबई मार्गावरून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.