ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा मार्ग मानला जाणारा मुंब्रा बाह्यवळण मार्ग अखेर दोन महिन्यांच्या दुरूस्ती कामानंतर बुधवारपासून रात्रीपासून सुरू झाला आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्ग सुरू झाल्याने ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा, ऐरोली टोलनाका या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथून उरण जेएनपीटीहून सुटणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक गुजरात, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने होत असते. तसेच ठाणे शहरातूनही हजारो वाहन चालक कामानिमित्ताने नवी मुंबईत वाहतूक करण्यासाठी या मार्गाचा वापर करत असतात. या मार्गावरील रेतीबंदर पूलाच्या भागात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत असतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या वाहतूक कोंडीला ठाणेकरांना सामोरे जावे लागते. यावर्षी पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका व्हावी यासाठी रेतीबंदर पूलाच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. त्यानुसार पूलाच्या ६०० मीटरच्या भागातील दुरुस्ती ४ एप्रिलपासून सुरू झाली होती. या दुरुस्तीसाठी मलेशियातील तंत्रज्ञान वापरले आहे. बुधवारी सकाळी येथील जोडणीचे काम पूर्ण झाल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्ग सुरू करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी घेतला.

हेही वाचा >>>ठाण्यात वीजेचा धक्का लागून भटक्या श्वानाचा मृत्यु? खांबातून वीजेचा प्रवाह होत नसल्याचा ठाणे महापालिकेचा दावा

मागील दोन महिन्यांपासून मुंब्रा बाह्यवळण मार्ग बंद असल्याने उरण येथून जेएनपीटी बंदरातून सुटणारी अवजड वाहने ठाणे-बेलापूर, पूर्व द्रुतगती महामार्गाने घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करत होती. या अवजड वाहनांमुळे नवी मुंबईतील दिघा, ऐरोली टोलनाका येथे अवजड वाहनांच्या रांगा लागत होत्या. वाहन चालकांना अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास लागत होता. मुंब्रा बाह्यवळण मार्ग सुरू झाल्याने वाहन चालकांना या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा >>>ठाणे: जाहीरात फलक पडून जिवीतहानी झाल्यास मालकावर गुन्हा दाखल होणार

मुंब्रा बाह्यवळण मार्गावर सुमारे सहा वर्षांपूर्वीच दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु येथील रेतीबंदरच्या भागातील पूलाचे काम त्यावेळी करण्यात आले नव्हते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रेतीबंदर पूलावर मोठे खड्डे पडत होते. रेतीबंदर पूलाची दुरूस्ती झाल्याने खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra bypass road in thane district reopened from wednesday night after two months of repair work thane amy
Show comments