ठाणे : मुंब्रा येथे एका मोकळ्या जागेत मेफेड्राॅन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या परवेझ खान (२२) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल आणि ६३ ग्रॅम वजनाचे १ लाख ५७ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

मुंब्रा येथील मित्तल मैदान परिसरात एकजण मोकळ्या जागेत एमडी या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकांनी सोमवारी रात्री सापळा रचला. त्यावेळी एका तरुणाची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव परवेझ असल्याचे सांगितले. तसेच तो मुंब्रा येथील अमृतनगर भागात राहत असल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या पँटच्या खिशामध्ये एमडी पावडचे पाकिट आढळून आले. हे एमडी पावडर ६३ ग्रॅम इतक्या वजनाचे होते. पोलिसांनी त्याची विचारणा केली असता, त्याने हे अमली पदार्थ त्याचे असल्याची कबूली दिली. याप्रकरणी त्याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Story img Loader