ठाणे : राज्यात काय झाले, हे मला माहित नाही पण, कळवा- मुंब्रा भागातील जनतेने आम्हाला प्रचंड कौल दिला आणि आम्ही लाखांच्या मताधिक्याने निवडुन आलो. आता महापालिकेच्या निवडणुका येतील. तेव्हाही आम्हाला कौल द्या, अशी साद राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी कळव्यातील शिमगोत्सवात बोलताना केला. आम्ही काम करणारी माणसे आहोत, आम्ही पक्ष बदलणारी माणसे नाही अशी टोलाही त्यांनी अजित पवार गटाला यावेळी लगावला.
कळवा येथील भूमिपुत्र मैदान येथे ‘संघर्ष’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी शिमगोत्सवासह भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात उपस्थितांशी संवाद साधताना आव्हाड यांनी महापालिकेच्या निवडणुकीतही कौल देण्याची साद घातली.
कोकणातील संस्कृती टिकली पाहिजे, या भावनेने गेले १४ वर्षे अरविंद मोरे यांच्या पुढाकाराने हा उत्सव साजरा करीत आहोत. मला आठवतय की, अरविंद मोरे हे माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा हा पालखीचा विषय घेऊन आले. त्यावेळी आम्ही गावातल्या पालखीसाठी म्हणून गावात देवाकडे कौल मागितला होता आणि कौल मिळाल्यानंतर ही पालखी इथे आली. ही पालखी गेले १४ वर्षे कौल घेऊन नाचते आणि आम्हाला कौल मिळतोय, असे आव्हाड म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीतही येथील जनतेने आम्हाला कौल दिला. महाराष्ट्रात इतरत्र काय झाले, हे मला माहित नाही. पण कळवा -मुंब्य्राच्या जनतेने प्रचंड कौल दिला आणि लाखाच्या मताधिक्याने आम्ही निवडून आलो. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतील. निवडणुकीत जनता केलेल्या कामाचा हिशोब देते. त्यामुळे तुम्हाला मला एवढेच सांगायचं की महापालिकेतही आम्हाला कौल हवा आहे. आम्ही काम करणारी माणसे आहोत, आम्ही पक्ष बदलणारी माणसे नाही, असे आव्हाड म्हणाले.
जिथे आहोत, तिथे प्रामाणिकपणाने आहोत. सत्ता असो किंवा नसो याची आम्हाला चिंता नाही. तसेच सत्ता आहे म्हणून त्याच्याकडे जाऊ अशातला आमचा स्वभाव पण नाही. एकाला बाप मानला तर त्या बापाबरोबर आयुष्य काढण्याची आमची सवय आहे आणि म्हणून कुठल्याही अवघड प्रसंगाला न घाबरता हा तुमचा आमदार कायम शरद पवारांबरोबर राहिला. जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत शरद पवारांबरोबरच राहील, असेही आव्हाड म्हणाले. लोकांना गद्दारी आवडत नाही. ज्या बापाने हाताला बोट धरून मोठे केले, त्या बापाच्या हाताला झटका मारलेला लोकांना कधीही आवडत नाही, असेही ते म्हणाले.
औरंगजेब कोणाचा नातेवाईक नाही
आपल्या सत्तेच्या माध्यमातून आपण लोकांना खुश ठेवू शकत नाही, हे बघून आता नवीन नवीन विषय काढले जातात. उगाच काहीतरी बोलायचे, भांडणे लावायची म्हणून काहीतरी विषय काढायचे. औरंगजेब कोणाचा नातेवाईक नाही, त्याला विरोध सगळ्यांचा आहे. त्याला स्वराज्याचा शत्रूच मानतात पण, त्या औरंगजेबाला पन्नास वर्ष लढून सुद्धा महाराष्ट्रावरती पाय रोवता आले नाही. महाराष्ट्रावरती आपला झेंडा फडकविता आला नाही, ही आमच्या शौर्याची निशाणी आहे, असे आव्हाड म्हणाले. शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो नंतरच्या काळात ताराराणी असो एवढा बलाढ्य सुलतान हा महाराष्ट्रात टिकू शकला नाही आणि अखेरीस त्याचे थडग या महाराष्ट्रात उभे राहिले. ही पुढची हजारो वर्ष प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे की, या सुलतानाला आम्ही या महाराष्ट्राच्या मातीतच ठेचला. इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर काढायची म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास उद्ध्वस्त करणे असाच प्रकार आहे, असेही ते म्हणाले.
कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड- कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात आली होती. या अनुषंगाने आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत सबंध रत्नागिरी जिल्ह्यातील विवाध पथकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला. शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पालखी नृत्य पथक कुशिवडे, रत्नागिरी यांनी पटकावले. तर, सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निवे तालुका संगमेश्वर आणि साई सेवा महिला पालखी नृत्य पथक , आंबेशेत यांनी तिसरे पारितोषिक पटकावले.