ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर भागात काही दिवसांपूर्वी पाचव्या मजल्यावरून पाळीव श्वान इमारती खालून जाणाऱ्या मुलीच्या अंगावर पडल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर जहर सय्यद (२४) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. श्वान पाचव्या मजल्यावरून नेमके कसे पडले याचा तपास पोलीस करत आहेत.
अमृतनगर येथील दर्गा रोड परिसरातून सनाबानो शेख (५) ही तिच्या आईसोबत एका इमारतीखालून पायी जात होती. त्याचवेळी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक श्वान थेट सनाबानो हिच्या अंगावर पडले. या घटनेत तिच्या डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा…कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात एका कैद्याचा दुसऱ्या कैद्यावर हल्ला
या विचित्र घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली. या घटनेचे चित्रीकरण देखील समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. अखेर मुलीच्या आईने याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी श्वान मालक जहर सय्यद याला अटक केली आहे. तर या घटनेत पाळवी श्वानाला देखील गंभीर दुखापत झाली आहे. श्वान मालकाने त्याच्या इमारतीच्या गच्चीवर काही श्वान पाळले आहेत. त्याच्याकडे श्वानांचा परवाना आहे का, तसेच हे श्वान कसे पडले, याचा तपास पोलीस करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd