ठाणे : मुंब्रा शहरातील मित्तल मैदान येथे मेफोड्राॅन (एमडी) हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद सैफ चष्मावाला (२५) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या तस्कराकडून एक लाख ५७ हजार रुपयांचे एमडी हे अमली पदार्थ, ॲपल कंपनीचा मोबाईल, वाहन क्रमांक नसलेली दुचाकी, वजन काटा, बॅग असा एकूण दोन लाख १७ हजार रुपो किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुंब्रा येथील मित्तल मैदान येथे एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, रविवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पथकाने मित्तल मैदान परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एकजण दुचाकीने त्याठिकाणी आला. त्याच्या दुचाकीला वाहन क्रमांक नव्हते. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मोहम्मद सैफ चष्मावाला असल्याचे सांगितले. तसेच तो मुंबईतील जोगेश्वरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये ६५.५ ग्रॅम वजनाचे आणि एक लाख ५७ हजार रुपये किमतीची एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून ॲपल कंपनीचा मोबाईल, दुचाकी, वजन काटा, बॅग असा एकूण दोन लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.