वाढत्या तापमानामुळे आणि जंगलातील मानवी हस्तक्षेपामुळे अलीकडे चिमण्या पाहायलाच मिळत नाही, असा एक निराशावादी सूर पक्षीप्रेमींमध्ये ऐकायला मिळतो. झपाटय़ाने वाढलेल्या शहरीकरणामुळे टोलजंग इमारती उभ्या राहिल्या आणि या इमारतींच्या पल्याड सतत चिवचिव करणारी चिमणीही दिसेनाशी झाली. असे असले तरी चिमणी या पक्ष्याच्या जातीत मोडणारा मुनिया हा पक्षी पाहिल्यावर कुणाही पक्षीप्रेमीला भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. अतिशय लहान आकार आणि रंगांची विविधता यामुळे या मुनिया पक्ष्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. मराठी भाषेत मुनिया तर इंग्रजीत फिंच असे या पक्ष्यांना संबोधले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मुनिया पक्ष्यांची विविधता एवढी की वेगवेगळ्या शारीरिक रूपात जगभरात या पक्ष्यांचे वास्तव्य आढळते. मुनिया पक्ष्यांच्या २१८ जाती निदर्शनास आल्याचे पक्षीमित्रांकडून सांगण्यात येते. समशीतोष्ण वातावरणात भरपूर प्रमाणात हे पक्षी आढळतात. अतिथंड वातावरणात मात्र या पक्ष्यांचे वास्तव्य फारसे आढळत नाही. मुनिया पक्ष्यांच्या आकर्षक रूपामुळे जगभरात हे पक्षी मोठय़ा प्रमाणात पाळले जातात. वेगवेगळ्या रंगात हे पक्षी आढळत असल्याने प्रत्येक ठिकाणी या पक्ष्यांचे वेगळे रूप पाहायला मिळते. मुनिया या पक्ष्याच्या काही प्रजाती आढळतात. ग्रोसडेक्स, हॉफिंच, जॅपनिज, वाइन फिंच, आफ्रिकन फिंच, मंगोलियन फिंच, अकिकी, पालिया अशा मुनिया पक्ष्याच्या काही जाती आढळतात. त्यापैकी काही भारतीय जातीसुद्धा आढळतात. गवताळ किंवा दाट प्रदेशात मुनिया पक्ष्यांचे वास्तव्य आढळते.

स्थलांतर नाही..

मुनिया पक्षी ज्या परिसरात आढळतात, त्याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर करण्याची या पक्ष्यांची सवय आणि क्षमता नाही. लहान अंतरापर्यंतच मुनिया पक्षी विहार करतात. दिवसभर चपळ आणि उत्साही वृत्ती हेच या पक्ष्यांचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.

मोकळी हवा आणि मुक्त विहार

घरात पाळताना हे पक्षी लहान असले तरी त्यांना मोकळे वातावरण, हवा मिळेल याची काळजी घ्यावी लागते. रंगीबेरंगी आकारामुळे हे मुनिया घरातील पिंजऱ्यात शोभून दिसत असले तरी मुक्त विहाराची सोय असल्यास उत्तम ठरते. यासाठी घरातील पिंजरा ऐसपैस असल्यास हे पक्षी अधिक खेळकर राहतात. पिंजऱ्यात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचण्याचे अंतर ऐसपैस असल्यास दिवसभर या पक्ष्यांची पिंजऱ्यात धांदल असते. यामुळे चांगली भूक या पक्ष्यांना लागते आणि अधिक स्वच्छंदपणे हे पक्षी पिंजऱ्यात विहार करू शकतात.

जगभरात कॅप्टिव्हिटीमध्ये मोठय़ा प्रमाणात या पक्ष्यांचे ब्रीडिंग होते. नर आणि मादी ओळखता आल्यास घरच्या घरीही या पक्ष्यांचे ब्रीडिंग करता येते. वेगवेगळ्या जातींच्या मुनिया पक्ष्यांना एकत्र करून मिश्र ब्रीड तयार करता येते. स्वस्त दरात हे पक्षी उपलब्ध होत असल्याने जगभरातील प्रत्येक देशात मुनिया आवडीने पाळले जातात.

आहारात फळे, फुलांचा समावेश गरजेचा..

मुनिया पक्षी साधारण जंगलात आढळत असल्याने फळे आणि फुले हाच या पक्ष्यांचा विशिष्ट आहार असतो. विशेष म्हणजे फळातील रस, फुलातील मध खाण्याची सवय या पक्ष्यांना असते. त्यामुळे घरात पाळताना फळे आणि फुलांसारखा आहार या पक्ष्यांना द्यावा लागतो. फळांच्या बियाही हे पक्षी खातात. फळांच्या फोडी खात नसले तरी फळांचा रस शोषून घेऊन आपला आहार हे पक्षी ग्रहण करतात.