डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील शेवंता हाईट्स या बेकायदा इमारतीवर पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी कारवाई केली. सहा वर्षापूर्वी ही बेकायदा इमारत भूमाफियांनी उभारली होती. ही इमारत पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत घोषित केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही बेकायदा इमारत मयत शेवंताबाई जोशी यांच्या नावाने होती. शेवंताबाई यांचे वारस विजय दत्तू जोशी, वंदना प्रकाश जोशी, अरूण दत्तू जोशी आणि विकासक प्रमोद अरूण देसाई, राहुल अरूण मैद यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता ही बेकायदा इमारत उभारली होती. या इमारती विषयी पालिकेत अनेक तक्रारी आल्या होत्या.

हेही वाचा >>>झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण

यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांनी ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित केली होती, पण या इमारतीवर तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी कारवाई केली नव्हती. विद्यमान साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मंगळवारी विष्णुनगर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त घेऊन ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. या इमारतीचे पहिले खांब, भिंती तोडण्यात आल्या. नंतर पोकलेन लावून ही इमारत भुर्ईसपाट केली जाईल, असे ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितले.ही इमारत पुन्हा बेकायदा पध्दतीने उभारण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला तर त्यांच्या एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सावंत यांनी दिला.

हेही वाचा >>>घोडबंदरमध्ये भरवस्तीत सिमेंट काँक्रीट प्रकल्प, हावरे सिटी संकुलासह परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

ह प्रभागातील बेकायदा बांधकामे

ह प्रभागातील बेकायदा म्हणून घोषित केलेल्या जुन्या डोंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांची फशी हाईट्स, गटार तोडून उभारलेली बेकायदा इमारत, उमेशनगर जवळील राहुलनगर मधील सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड, कोपर येथील सखारामनगर काॅम्पलेक्स जवळील रस्त्यात उभारलेली बेकायदा इमारत, कोपरमध्ये बीएमपी गृहसंकुल भागात उभारलेली बेकायदा इमारत, ठाकुरवाडीतील शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला इमारत, गरीबाचापाडा श्रीधर म्हात्रे चौकातील क्रीडांगण आरक्षणावरील वसंत हेरिटज इमारत, चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील भागातील बेकायदा इमारतीचा पाया, कोपर रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचा कोंबड्याचा खुराडा, खंडोबा मंदिराजवळील बेकायदा इमारत. तसेच, देवीचापाडा खाडी किनारी सुरू असलेल्या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी सुरू करावी, अशी मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal action on illegal construction in navapada area of dombivli amy