ठाणे : शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्याने, ठाणे शहरात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक दरवर्षीपेक्षा कमी लागले आहेत. असे असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघात काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसांचे फलक लागले होते. पालिका आयुक्तांच्या दौऱ्याआधी हे बॅनर काढण्याची कारवाई करण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे समर्थक आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर टिका करत सर्वांसाठी एकच नियम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तर, संपुर्ण शहरातच नियमितपणे कारवाई सुरु असते. त्याच कारवाईचा हा भाग असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक तसेच शिवसैनिकांकडून समर्थन मिळत आहे. दिवसेंदिवस समर्थनामध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे चित्र आहे. या राजकीय उलथापालथीनंतर बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. ऐरवी त्यांचा वाढदिवस जिल्ह्यात जोरात साजरा होता. विविध उपक्रम राबविण्यात येतात. मोठे बॅनर शहरात झळकतात. या वाढदिवशी मात्र जिल्हयात शुकशुकाट पहायला मिळाला. ठाणे शहरातील चौक, उड्डाण पुल तसेच विविध भागात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे फलक दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. परंतु यंदा दरवर्षीच्या तुलनेत कमी बॅनर असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कोपरी-पाचपखाडी भागात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारा एक फलक लावण्यात आला होता. त्यावर शिवसेना कोपरी विभाग असा उल्लेख होता. तसेच इतरही शुभेच्छा बॅनर होते. या भागात पालिकेच्या पथकाने बेकायदा बॅनर उतरविण्याची कारवाई केली. त्यामध्ये या फलकावरही कारवाई करण्यात आली. पालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी कोपरी भागात विसर्जन घाटांचा पाहणी दौरा केला. त्याआधी ही कारवाई करण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे समर्थक आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर टिका केली आहे. बेकायदा गोष्टीचे आम्ही समर्थन करणार नाही. परंतु नियम हा सर्वांच सारखा असला पाहिजे. महापालिका आता जशी तत्परता दाखवते, तशी त्यांनी रस्त्यावरील खड्डे भरणी व इतर कामांसाठीही दाखवावी, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. तर, संपुर्ण शहरातच नियमितपणे कारवाई सुरु असते. त्याच कारवाईचा हा भाग असल्याचे पालिका उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांनी केली विसर्जन घाटांची पाहणी

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी पाहणी केली. प्रत्येक विसर्जन घाटावरील अत्यावश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश देतानाच यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी शहरातील उपवन तलाव, कोलशेत महाविसर्जन घाट, पारसिक रेतीबंदर, मुंब्रा, मासुंदा तलाव, कोपरी व रायलादेवी तलाव या ठिकाणच्या विसर्जन व्यवस्थेची  पाहणी केली. यावेळी गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे तसेच शहरात इतर ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागास दिले.  तसेच विसर्जन घाटावर आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देणे, विद्युत व्यवस्था, गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था करणे, गणेशमूर्ती विसर्जन फिरते स्विकृती केंद्रासाठी, निर्माल्य वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यानी संबंधितांना दिले. गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा  उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करोनाची खबरदारी म्हणून प्रत्येक विसर्जन ठिकाणी शीघ्र प्रतिजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून तिथे वर्धक मात्रा देण्याचीही व्यवस्थाही करण्यात येणार आहे.