ठाणे : ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासानाने गेल्या काही महिन्यांपासून पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाडी किनारी भागातील रस्त्यांचे प्रवेशद्वार खणून हे मार्गच बंद करण्यापाठोपाठ आता सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, खारफुटीवर टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून या कामासाठी २८ ते ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे हा खर्च करायचा कसा, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
ठाणे शहराला सुमारे ३२ किमीचा खाडीकिनारा परिसर लाभला आहे. ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी-प्रजाती आढळून येतात. या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा विशेष महत्त्व आहे. यामुळेच ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून भुमाफियांकडून खाडी किनारी भागात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या अतिक्रमणामुळे खाडी किनारी भागातील खारफुटी मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे.
हेही वाचा…‘गुलाबी’ आव्हानासाठी सज्ज; प्रकाशझोतातील कसोटी आजपासून; भारताचे आघाडी दुपटीचे लक्ष्य
यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याबरोबरच भविष्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपुर्वी ठाणे शहरातील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीला लागूनच असलेल्या कोलशेत खाडी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नवे बेट उभारण्यात येत असल्याची बाब समोर आली होती. यावरून टिका होऊ लागताच पालिका आणि जिल्हा प्रशासनाने भराव रोखण्याचे काम हाती घेतले होते. कोलशेत खाडी किनारी भागात खारफुटीवर भराव टाकण्यासाठी भुमाफियांनी तयार केलेले रस्त्यांचे प्रवेशद्वार खणून हा मार्गच बंद करण्याचे काम पालिकेने केले होते. त्यापाठोपाठ आता या भागांमध्ये मातीचा भराव टाकला जाऊ नये यासाठी पालिकेने ३४ ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यात आतापर्यंत काही मातीचा भराव टाकणारे ट्रक आढळून आले असून याबाबत प्रदुषण नियंत्रण विभागाकडून संबंधित प्रभाग समितीला कळविले आहे. त्यांच्याकडून पुढील कार्यावाही सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
चौकट
कोकण विभागीय कांदळवन समितीकडे खाडी किनारी भागातील भरावाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याआधारे या समितीने खाडीकिनारी भागात टाकलेला भराव काढून टाकण्याची सुचना पालिकेला केली आहे. त्यामध्ये खारेगाव टोल नाका परिसर, कोलशेत खाडीजवळील जलवाहीनीलगतचा भाग आणि कोलशेत विसर्जन घाट परिसर, चेंदणी परिसर या भागांचा समावेश आहे. येथील भराव भराव काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून या कामासाठी २८ ते ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे या कामासाठी पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या कामासाठी निधी कुठून आणायचा, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
हेही वाचा…डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा, दहा दिवसांत इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश
ठाण्यातील खाडी किनारी भागात मातीचा भराव टाकला जाऊ नये यासाठी ३४ ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, कोकण विभागीय कांदळवन समितीने केलेल्या सुचनेनुसार खारफुटीवर टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू आहेत.
प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका