ठाणे : मार्च महिनाअखेरपर्यंत पाणी देयकांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या देयकाची रक्कम भरली नाहीतर, संबंधित थकबाकीदाराचा पाणी पुरवठा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खंडीत करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. तसेच, थकबाकीवरील प्रशासकीय आकार, दंड, व्याज यांच्यावर लागू असलेली १०० टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नसून या अभय योजनेची मुदत ३१ मार्च, २०२५ पर्यंतच असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अर्थसंकल्पामध्ये २२५ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासुन प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच, मार्चअखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, पाणी पुरवठा विभागाने उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वात वर्तक नगर, लोकमान्य नगर आणि सावरकर नगर, माजिवडा-मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी वसुली मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गुरूवारी मोठे गृहसंकुल, टाॅवर येथे कारवाई करण्यात आली. ब्रम्हांड फेज तीन, लोढा क्राऊन, दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून ५० लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली.
मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी देयकांची रक्कम भरणा करणार नाहीत, अशा ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, थकबाकीवरील प्रशासकीय आकार, दंड, व्याज यांच्यावर लागू असलेली १०० टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नसून या अभय योजनेची मुदत ३१ मार्च, २०२५ पर्यंतच असल्याचेही प्रशासनाने तसेच, थकबाकीवरील प्रशासकीय आकार / दंड/ व्याज यांच्यावर लागू असलेली १०० टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.
आतापर्यंत १२७ कोटी रुपयांची वसुली पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू देयकांच्या २२५ कोटी रुपयांपैकी १२७ कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्यावर्षीच्या याच काळातील वसुलीपेक्षा १२ कोटी रुपयांनी अधिक आहे, असे विनोद पवार यांनी सांगितले. पाणी देयक भरलेले नसल्याने दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणी पुरवठा सकाळी बंद करण्यात आला. त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा लगेच सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे, बाळकूम येथे लोढा क्राऊन आणि परिसरातील इमारतींवरही कारवाई करण्यात आली. संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे १३ लाख ५१ हजार रुपयांचा देयकाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली.