ठाणे सॅटिस प्रकल्पाचे कामही नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : पूर्व भागातील म्हणजेच कोपरी परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत असून या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्पाचे काम येत्या पाच महिन्यांमध्ये पूर्ण करण्यासाठी नियोजन करा तसेच ठाणे पश्चिम स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करुन संपूर्ण परिसर फेरीवालामुक्त व  स्वच्छ राहिल, यादृष्टीने ठोस कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे.

हेही वाचा >>> मोडक महाराज यांचे पुणे-सातारा मार्गावर भीषण कार अपघातात निधन

ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गबैठकी बैठक घेऊन स्मार्ट सिटी लि.च्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात येत असलेला ठाणे पूर्व सॅटीस प्रकल्प हा वाहतूक सुनियोजित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा पूल आहे. या पुलाच्या माध्यमातून ठाणे स्टेशन पूर्व परिसरात जी बसेसची वाहतूक होते, ती पूर्णत: स्वतंत्र करण्याचे नियोजन आहे. या पुलाचे काम नियोजित वेळेनुसार सुरू असून पुलाच्या बांधणीसाठी एकूण ५८ खांब नियोजित आहेत. या खाबांपैकी एकूण ४८ खाबांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ९ खांबांचे काम सुरू असून त्यापैकी काही खांब हे शासकीय जागेत उभारावयाचे आहेत. त्या जागेसंदर्भात संबंधित शासकीय आस्थापनांना पत्रव्यवहार करण्याचे आदेश देत सुरू असलेली प्रकल्प कामे नियोजित  वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी ठाणे स्मार्ट सिटी विभागाला दिल्या आहेत. हा पूल रेल्वे रूळ ओलांडून जाणार असल्यामुळे या ठिकाणचे बांधकाम हे सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार नसून त्याठिकाणी धातूचा पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करावा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये रुग्णालयाची रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडमोड डॉक्टर, परिचारिकांना मारहाण

ठाणे शहराला 26 कि.मी. खाडी किनारा लाभला असून खाडीलगतचा परिसर सुंदर करुन नागरिकांना सुट्टीच्या दिवशी विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होईल या उद्देशाने खाडीकिनारा सुशोभिकरण प्रकल्प स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. ही सर्व कामे अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असून येत्या पाच महिन्यांमध्ये ही सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन केले आहे. हि कामे अधिक गतीने पूर्ण करुन कोणत्याही परिस्थितीत ही सर्व कामे पूर्ण होतील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ठाणे स्मार्ट सिटी व्यतिरिक्त इतर निधीतून सुरू असलेल्या एकूण चार प्रकल्पांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. या प्रकल्पामधील पूर्ण झालेल्या एलईडी पथदिवे, शाळेंच्या छतावर लावण्यात येणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पाची माहिती घेतली. शहरात १० ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विकेंद्रीकरण प्रकल्पापैंकी 9 प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित एक प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात  सुरू असलेल्या नाल्याची कामे ३१ जानेवारी २०२३ पर्यत पूर्ण करण्यात यावीत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेल्या एकूण 39 प्रकल्पांपैकी सद्यस्थितीत सुरू असलेल्या १४ प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे आदेशही त्यांनी दिले. ठाणे व मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वेस्थानकाच्या कामकाजाचा आढावा देखील घेतला. शहरातील भुयारी गटार योजनांची कामे देखील वेळेत करण्याच्या दृष्टीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात आतापर्यत एकूण ४०० पैकी 330 कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत उर्वरित 70 कॅमेरे  जोडणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना बांगर यांनी यावेळी दिल्या. तसेच हाजुरी येथील  इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर येथील व्हीएमएस आणि व्हीए या  प्रणालीतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याची कामे देखील तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal commissioner abhijit bangar order to make thane west station area hawkers free zws