कल्याण- पालिकेने निश्चित केलेल्या मैदानातच विक्रेत्यांनी फटाके विक्री करावी. मैदाने सोडून फटाके विक्रेेत्यांनी मंच लावून रस्त्यांवर फटाके विक्री सुरू केली असेल तर अशा फटाके विक्री दुकानांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील नागरिकांची दिवाळी गोड

शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर फटाके विक्री दुकानांना परवानगी दिली आणि काही दुर्घटना घडली तर त्याचे खापर पहिले या दुकानांना परवानगी देणाऱ्या पालिका प्रशासनावर फुटणार आहे. त्यामुळे आयुक्त डाॅ. दांगडे यांनी दिवाळी सण असला तरी एकाही फटाके विक्रेत्याला रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्रीचा मंच उभारणीस परवानगी देऊ नका, असे आदेश प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

बुधवारी रात्री पहाणी दौऱ्याच्या वेळी आयुक्तांना डोंबिवली, कल्याण शहराच्या काही भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर फटाके विक्रीचे बेकायदा मंच लागले असल्याचे दिसून आले. फटाके विक्रीचा एकही मंच, दुकान शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर दिसणार नाही. अशा विक्रेत्यांचे मंच तोडून टाकावेत आणि संबंधित विक्रेत्यावर कारवाई करावी, असे आदेश आयुक्त डाॅ. दांगडे यांनी दिले आहेत.

हेही वाचा- ठाणे: दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात दुध बंदी; ‘या’मागण्यांसाठी दुध विक्रेत्यांचे शुक्रवारी दुध बंद आंदोलन

डोंबिवलीत सर्वाधिक विक्रेते

डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात एकही बेकायदा फटाके विक्रीचे दुकान सुरू होणार नाही याची काळजी ह प्रभाग अतिक्रमण नियंत्रण विभागाचे बाजीराव अहिर, बुवा भंडारी, प्रकाश म्हात्रे घेत आहेत. ग प्रभागात संजय साबळे, पथक प्रमुख राजेश साळुंखे, वर्दळीच्या कल्याण रेल्वे स्थानक भागात साहाय्यक आयुक्त संजय कुमावत दोन पाळ्यांमध्ये कामगार रस्त्यावर तैनात करुन घेत आहेत.

कामगाराचा आशीर्वाद

डोंबिवली पूर्व फ प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक, फडके रस्ता भागात अनेक फटाके विक्रेत्यांनी फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगार अरुण जगताप यांच्या आशीर्वादाने फटाके विक्रीची दुकाने सुरू केली असल्याची चर्चा फटाके विक्रेत्यांमध्ये, बाजारात सुरू आहे. काही कामगारही हा विषय खासगीत मान्य करतात. अरुण जगताप यांच्यामुळे डोंबिवली पूर्वेतील फेरीवाले हटत नाहीत. त्यांचाच फेरीवाल्यांना आशीर्वाद आहे याविषयी दोन वर्षापासून आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांना जागरुक नागरिकांकडून तक्रारी केल्या आहेत. माजी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी जगताप याची बदली करण्याचे आदेश काढले. परंतु, जगताप यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील डोंबिवलीतील एका पदाधिकाऱ्याचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे कळते. जगताप यांची मूळ नियुक्ती सफाई कामगार संवर्गातील आहे. सर्व विभागांमधील सफाई कामगार घनकचरा विभागात हजर झाले. जगताप हे सफाई कामगार असुनही घनकचरा विभागात हजर होत नाहीत. सामान्य प्रशासन उपायुक्त, घनकचरा उपायुक्त त्यांच्यावर कारवाई करत नसल्याने इतर कर्मचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा- डोंबिवली एमआयडीसीत रात्रीचे प्रदूषण वाढले; नागरिकांच्या तक्रारी, नाल्यात रसायन ओतणाऱ्यांविरुध्द गुन्हा

मैदानात जाण्यास नकार

मैदाने शहराच्या एका बाजूला आहेत. तेथे कोणी येणार नाही. अशी फटाके विक्रेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी कामगाराला हाताशी धरुन रस्त्यांवर दुकाने सुरू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतांशी विक्रेते राजकीय मंडळींचे समर्थक आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal commissioner bhausaheb dangde order to take action against roadside firecracker shops in dombivli and kalyan thane dpj