ठाणे : भिवंडी शहरातील वाहतुक कोंडीच्या विळख्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नव नियुक्त महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडेही नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अनमोल सागर यांनी महापालिका अधिकारी आणि ठाणे पोलिसांसोबत बैठक आयोजित करुन वाहतुक कोंडी आणि इतर वाहतुक समस्येविषयी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. शहरातील वाहतुक कोंडीवर उपाय योजना करण्यासाठी एक कृती समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती येत्या दोन आठवड्यात भिवंडीच्या वाहतुक समस्या आणि उपाययजोना संदर्भाचा अहवाल सादर करणार आहे.
भिवंडी शहरातून मोठ्याप्रमाणात हलक्या वाहनांची वाहतुक होते. तसेच भिवंडीत गोदामांची संख्या अधिक असल्याने गुजरात आणि उरण जेएनपीटीहून येणारी अवजड वाहने देखील शहरात वाहतुक करतात. मुंबई नाशिक महामार्ग, कशेळी- भिवंडी रोड हे महत्त्वाचे मार्ग देखील शहरातून जातात. असे असले तरी रस्त्यांची स्थिती चांगली नसल्याने अतिक्रमण, बेशिस्त वाहतुकीमुळे दररोज नागरिकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडी महापालिकेत अनमोल सागर यांची नियुक्ती झाली आहे. भिवंडीत वाहतुक समस्येविषयी नागरिकांच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी ठाणे पोलीस विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत अनमोल सागर यांची महत्त्वपुर्ण बैठक पार पडली. आयुक्त सागर यांनी या बैठकीमध्ये शहरामध्ये वाहतुक कोंडीची ठिकाणे, रस्त्यावरील अतिक्रमण, वाहन तळासाठी जागा निश्चिती इत्यादी बाबींचा आढावा घेतला.
तसेच शहरातील वाहतुक कोंडीवर उपाय योजना करण्यासाठी एक कृती समिती गठीत करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस विभागाचे अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती शहरातील वाहतुक कोंडीच्या ठिकाणांवर करण्यात येणाऱ्या उपाय योजना, सिग्नल यंत्रणांचा वापर, रिक्षा चालकांसाठी वाहनतळ, वाहन शुल्क भरून वाहन तळ, अनधिकृत रिक्षांना बंदी, महत्त्वाच्या रस्त्यांवर सम-विषम तारखांना पार्किंग सुविधा करता येईल का याबाबत अभ्यास करणे, वाहतुक साहाय्यकांची नेमणुक करणे, सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत वाहतुक कोंडीची ठिकाणे मोकळी करणे बाबत दोन आठवड्यात अहवाल सादर करणार आहे. दोन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा अहवाल सादर होणार आहे.
तसेच, यापुढे महापालिकेतर्फे कोणत्याही भागात रस्ते दुरूस्ती, पाणी पुरवठा वाहिनींची कामे करण्यापुर्वी पोलीस विभागाला कळवून त्या भागातील वाहतुकीचे नियमन केले जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले. या बैठकीस भिवंडी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर, साहायक पोलीस आयुक्त दीपक देशमुख, साहायक पोलीस आयुक्त ओहोळ, शहर अभियंता जमील पटेल यांच्यासह पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.