लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे : पाणी पुरवठ्याविषयीच्या तक्रारींबाबत मिळणारी उत्तरे बेजाबदार असून या विभागातील बहुतांश अधिकारी यांचा चालढकल करण्याचा असल्याचे निरिक्षण नोंदवत पाणी समस्येवर आपल्याला तोडगा काढता येत नसेल, तर ते संस्था म्हणून आपले अपयश आहे, अशा शब्दात ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. रात्री-अपरात्री पाणी सोडणे म्हणजे महिलांच्या स्वास्थ्याशी खेळण्यासारखे असल्याने त्यांच्या सोयीनुसार पाणी वितरणाची वेळ असावी आणि पाणी पुरवठ्याबद्दल कोणतीही तक्रार आली तर ती विनाविलंब दूर करण्यासाठी अभियंत्यांनी संवेदनशीलता दाखवावी. त्याचबरोबर उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तत्काळ तयार करण्याचे आदेशही त्यांनी बैठकीत दिले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी वितरणाबद्दल येणाऱ्या तक्रारी, शटडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी यांच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता अशा सर्वांची आयुक्त बांगर यांनी नुकतीच एक बैठक घेतली. शहरातील कामांची पाहणी करताना पाणी वितरण, रस्त्यांच्या कामांमुळे वितरणात आलेल्या समस्या, जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी चार दिवस बंद ठेवण्यात आलेला पाणी पुरवठा आणि त्याचा संपूर्ण शहरावर झालेला परिणाम, या सर्वाचा आढावा आयुक्त बांगर यांनी बैठकीत घेतला.
आणखी वाचा- डोंबिवलीत आयरे गाव हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामांना नोटिसा, बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश
नागरिक किंवा लोकप्रतिनिधी यांच्यापैकी कोणाकडूनही तक्रार आली तर ज्या गांभीर्याने त्या तक्रारी पाहिल्या पाहिजेत, त्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिले जात नाही. त्याबाबत आयुक्त बांगर यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. समस्या टोलवण्याबद्दलचे एक उदाहरणही त्यांनी यावेळी दिले. एका नगरसेवकाने पाणी गळतीची तक्रार दिली. त्यावर तीन वर्षे काहीच कारवाई झाली नाही. चौकशी केल्यावर केवळ १२ लाख ५० हजारांचा खर्च केल्यावर पाण्याची समस्या दूर होणार असल्याचे लक्षात आले. मग ते काम का करण्यात आले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पाणी पुरवठा विभागाच्या कामात आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. पाणी वितरणातील त्रुटी दूर केल्या तर किमान २० टक्के पाणी पुरवठा वाढू शकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे त्या त्रुटी शोधून त्यावर कार्यवाही करण्यास प्राधान्य हवे. त्यासाठी कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंता यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात सतत फिरायला हवे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष पाण्याची गती, वेळ याची माहिती घ्यावी आणि आवश्यक ते उपाय तत्काळ करावेत. प्रत्येक तक्रार ही नवीन समजून बारा तासांच्या आत त्या जागेची पाहणी करायलाच पाहिजे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींना त्याबद्दल अवगत करावे. आपल्यापर्यंत तक्रार येईपर्यंत मूळातच उशीर झालेला असतो. त्यामुळे तक्रार समजून घेण्यात हयगय नको, असा स्पष्ट इशाराही त्यांनी अभियंत्यांना यावेळी दिला.
महापालिकेतर्फे कोणतीही सेवा पुरवली जात असताना आपले उत्तरदायित्व लोकांप्रती आहे. हे मनावर ठसवून काम करावे. तसेच, नागरिकांच्या तक्रारी सोडवा. सुविधांबाबत त्यांचा प्रतिसाद काय आहे ते जाणून घ्यावे. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा- VIDEO: ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात पुन्हा राडा, शिंदे गटाने कुलूप तोडून शिवसेना शाखेवर घेतला ताबा
उन्हाळ्याचे नियोजन
यंदाच्या उन्हाळ्यात तापमान आणखी वाढेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची गरज वाढेल. त्या काळात पाणी कमी पडायला नको. दुरुस्तीची कामे या तीन महिन्यात काढू नयेत. आपत्कालीन दुरूस्ती आवश्यक असेल तर कमीत कमी काळात करावी. नागरिकांना कमी त्रास होईल, असे पहावे. सलग २४ तास पाणी आलेच नाही, अशी वेळ येऊ देऊ नये. पावसाळ्यात रस्त्याच्या कोणत्या समस्या येतील, हे जसे पाहण्यास सुरूवात केली आहे, त्याचप्रमाणे कोणत्या भागात पाण्याची कोणती समस्या आहे, त्यावर उपाय काय, हे नकाशावर आखून त्याचे नियोजन करण्यात यावे. ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाण्याच्या स्रोतांकडून पाणी कमी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
आणखी वाचा-मुंबई, डोंबिवलीत ३७ घरफोड्या करणारे दोन सराईत चोरटे मुंब्रा मधून अटक
कुटुंबाचे स्वास्थ्य
दूषित पाण्याची समस्या शहरात काही भागात आहे. जल वाहिन्या जुन्या आहेत, सांडपाण्याच्या वाहिन्यांची त्यांचा संपर्क येतो, याबाबत तत्काळ उपाय झाले पाहिजेत. दूषित पाण्याबद्दलच्या तक्रारी यांना प्राधान्यक्रमातही अग्रक्रम द्यायला पाहिजे. ठाण्यासाऱख्या शहरात नागरिकांना दूषित पाणी मिळणे हे भूषणावह नाही. त्यामुळे तत्काळ उपाययोजना केली जावी. तसेच रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत पाणी भरण्याची वेळ असू नये. पाणी पुरवठा, वितरण, त्याचा साठा या सगळ्यांशी कुटुंबाचे स्वास्थ्य जोडलेले आहे. पाणी भरून ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातील महिलांची असते. रात्री-अपरात्री पाणी सोडणे म्हणजे त्यांच्या स्वास्थ्याशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे पाणी वितरणाची वेळ त्यांच्या सोयीची असावी. त्यासाठी काय रचना करता येईल, यावर अभियंत्यांनी विचार करावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.