महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या आदेशानंतर नौपाडा प्रभाग समितीच्या पथकाने ठाणे स्थानक तसेच तलावपाळी परिसरातील रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात कारवाई सुरु केली असून या संपुर्ण परिसरात सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत ही पथके गस्त घालीत असल्यामुळे हे दोन्ही परिसर गुरुवारी फेरिवाले गायब झाल्याचे दिसून आले. या कारवाईच्या निमित्ताने वर्षोनुवर्षे फेरीवाल्यांकडून अडविले जाणारे पदपथ आणि रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- विश्लेषण: ठाणे ते बोरिवली प्रवास २० मिनिटांत कसा होणार? प्रकल्पपूर्तीसाठी किती वर्षे प्रतीक्षा?

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज ६ ते ७ लाख प्रवासी प्रवास करतात. या स्थानक परिसरातील रस्ते आणि पदपथ फेरिवाल्यांकडून अडविण्यात येतात. सकाळ आणि सायंकाळ या गर्दीच्या वेळेत प्रवासी फेरिवाले ठाण मांडून बसत असल्यामुळे प्रवाशांना चालणे शक्य होत नाही. काही प्रवाशी फेरिवाल्यांना बाजूला होण्यास सांगतात. मात्र, फेरीवाले बाजूला होत नाहीत. काहीवेळेस ते प्रवाशांसोबत हुज्जत घालतात. याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढू लागल्याने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्थानक परिसराचा नुकताच दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाणे स्थानकातून प्रवाशांना सहजपणे बाहेर पडता यावे यासाठी हा चोवीस तास फेरीवाला मुक्त करण्यात यावा आणि त्यासाठी या भागात सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांची नेमणुक करण्यात यावी. रेल्वेस्थानकापासून चारही बाजूला १५० मीटरच्या परिसरात फेरीवाला बसणार नाही, अशाप्रकारची कारवाई करावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले होते. स्थानकाच्या आवारात ज्या ठिकाणी बेघर व्यक्ती असतील, त्यांना निवारा शेड येथे घेवून जावे. या परिसरात फेरीवाले आणि भिक्षेकरी बसणार नाहीत तसेच असामाजिक तत्वे जसे गर्दुल्ले यांचा वावर राहणार नाही, या दृष्टीने तोंडदेखली कारवाई न करता नियमित कारवाई करावी आणि त्याचबरोबर सहाय्यक आयुक्तांची नेमणूक ही रोटेशन पध्दतीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.

हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांविरोधात ‘मुंब्रा विकास आघाडी’, मुंब्य्रातील गडाला सुरुंग लावण्याची शिंदे गटाची रणनिती

नियमितपणे कारवाई सुरू राहीली नाही आणि फेरीवाल्याबाबत तक्रारी आल्यास नेमणूक केलेल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. या आदेशानंतर कोपरी-नौपाडा प्रभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी प्रभाग समितीची दोन पथके नेमून त्यांच्यामार्फत बुधवारपासून फेरिवाल्यांविरोधात कारवाई सुरु केली आहेत. सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा दोन पथकांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या असून ही पथके परिसरात गस्त घालून फेरिवाल्यांवर कारवाई करत आहेत. बुधवारी २२ फेरीवाल्यांविरोधात कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुरुवारपासून या भागातील फेरिवाले गायब झाल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- शहापूर : बनावट चाचणी अहवाल सादर करून तब्बल एक कोटी १९ लाखांचा अपहार; सहा ठेकेदारांवर गुन्हा दाखल

चौकातील वाहतूक नियोजन करा

अलोक हॉटेल समोरील असलेला रस्ता सद्यस्थ‍ितीत एकमार्गी आहे. परंतु या रस्त्यावर रिक्षांची वाहतूक सुरु असल्याने येथून नागरिकांना चालणे त्रासाचे होते. त्यामुळे वाहतूक विभागाशी चर्चा करुन एकाच मार्गावरुन रिक्षा वाहतूक सुरु राहील आणि पादचाऱ्यांना उर्वरित भागांमधून चालणे शक्य होईल, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या आहेत. या माध्यमातून रेल्वेस्टेशन परिसरात अधिकृत पार्किंग सुविधा निर्माण झाल्यामुळे अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार चौकातील वाहतूुकीचे नियोजन करण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation action against hawkers in thane station and talavpali area dpj