ठाणे : शहरात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विकासकांना नियम आखून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ०७ विकासकांना काम थांबविण्याचे आदेश महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे यांनी दिली. प्रदूषण नियंत्रण नियमावलीची पूर्तता केल्यावर या विकासकांना काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय योजना आखल्या जात आहेत. त्यानुसार, महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण ३१७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी १८२ ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नियमांच्या पूर्ततेसोबतच ०९ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या १२० बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू नये यासाठी कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांच्यापैकी ज्यांनी नियमांची पूर्तता केल्याचा अहवाल सादर केला, त्याची पडताळणी केली जात आहे. तर, नोटीस बजावण्यात आलेल्या सात विकासकांनी नियमांची पूर्तता केलेली नसल्यामुळे त्यांना काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे यांनी दिली आहे.

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे तसेच त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. त्यासंदर्भात, सर्व बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या पाहणीत ज्यांनी नियमावलीचे पालन केलेले नाही अशा बांधकाम स्थळांचा अहवाल प्राप्त झाल्यावर १४ ते १६ जानेवारी या काळात विकासकांना बांधकाम थांबविण्याच्या नोटीसा शहर विकास विभागाने बजावल्या होत्या, अशी माहिती महापालिकेमार्फत देण्यात आली.

या विकासकांवर कारवाई

नौपाडा येथील मे. स्कायलाईन इन्फ्रा, ठाणे येथील सुयश पाटणकर, माजिवडा येथील मे. अष्टविनायक एंटरप्रायझेस, सेवा रस्ता येथील मे. पद्मनाभ डेव्हल्पर्स, पारसिक येथील मे. सरस्वती एंटरप्रायझेस, पारसिक येथील मे. जय प्रॉपर्टीज आणि कळवा येथील मे. सिद्धीविनायक डेव्हल्पर्स या बांधकाम विकासकांना थांबवण्याची नोटीस दिल्या आहेत. काही विकासकांकडून नियमावलीची पूर्तता केल्याचे निवेदन शहर विकास विभागास प्राप्त झाले आहे. त्याची पडताळणी केल्यावरच बांधकाम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच, यापुढेही कोणाकडून नियमावलीचे पालन झाले नाही तर, अशाप्रकारे कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city sud 02