लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : उच्च न्यायालयातील एका खटल्याचा संदर्भ देत अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने बेकायदा बॅनरबाजीला लगाम लावल्याचे सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली असताना दुसरीकडे शहरातील बेकायदा बॅनरवर कारवाई करण्याची मागणी हिराली फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे पालिका प्रशासन माध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे कौतुक झाल्याचे सांगत असताना शहरात मात्र बेकायदा फलक झळकत होते.

स्वस्त असलेल्या बॅनर निर्मितीमुळे गेल्या काही वर्षात बॅनर झळकावणे फोफावले आहे. कोणीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तिला बॅनरद्वारे शुभेच्छा देत असल्याचे दिसून येते. अंबरनासारख्या शहरात उल्हासनगर शहरातली स्वस्त बॅनरची बाजारपेठ असल्याने या शहरांमध्येही बेकायदा बॅनरबाजी वाढल्याचे दिसून आले होते. त्यावर काही दिवसांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेने नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांना अशा बॅनरची तक्रार करण्याचे आवाहन दिले होते. मात्र यात तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवले जात नसल्याने याकडे नागरिकांनी पाठ फिरवली. परिणामी शहरात बेकायदा बॅनरबाजी उघडपणे सुरू होती.

मधल्या काळात अंबरनाथ नगरपालिकेने अधिकृत बॅनरवर क्यु आर कोड लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ज्यावर क्युआर कोड नाही ते बॅनर बेकायदा असल्याने त्यावर कारवाईचा मार्ग मोकळा होता. असे असले तरी सध्या शहरभर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बॅनर लावले जात असल्याची बाब हिराली फाऊंडेशनच्या माध्यमातून उघडकीस आणण्यात आली आहे. हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी याबाबत अंबरनाथ नगरपालिकेला मेलद्वारे तक्रार दिल्याची माहिती दिली आहे. शहरातील बेकायदा बॅनरबाबत यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही अशी माहिती सरिता खानचंदानी यांनी दिली आहे.

प्रदुषण वाढते आहे

शहरातील बेकायदा बॅनरबाजीमुळे प्रदुषणाचा मुद्दाही गंभीर होत चालला आहे, अशी बाब हिराली फाऊंडेशनने समोर आणली आहे. या बॅनरचे विघटन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे हे बॅनर जाळले जातात किंवा फेकले जातात. त्यामुळे याचे प्रदुषण वाढले असल्याचे दिसून आले आहे. शहरात फक्त विद्रुपीकरण होत नाही तर दृ्टी प्रदुषणही होत आहे. त्याहून अधिक प्रदुषण होत असल्याचे सरिता खानचंदांनी यांनी सांगितले आहे.

पालिकेने थोपटली स्वतःची पाठ

एकीकडे शहरात बेकायदा बॅनर ओसांडून वाहत असताना अंबरनाथ नगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपले बेकायदा बॅनरबाजीवर नियंत्रण ठेवल्याने कौतुक झाल्याचे सांगितले आहे. हे पत्रक जाहीर होत असताना शहरात पालिकेचे कर्मचारी धावपळीत बेकायदा बॅनर काढत होते. सध्या शहरात ५० हून अधिक ठिकाणी बॅनर असल्याचे पालिकेने मान्य केले आहे. मात्र मनुष्यबळ नसल्याने त्यावर कारवाई करण्यात अडचणी येत असल्याची बाबही पालिका कर्मचारी खासगीत सांगत आहेत.