वाचन चळवळ व्यापक करण्यासाठी महापालिकेचा निर्णय

सुहास बिऱ्हाडे, वसई

वसई-विरार महापालिकेने मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि वाचनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी शहरातील सर्व ग्रंथालयांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रंथालयांना जीवदान मिळणार आहे.

शहरात एकूण १८ वाचनालये आहेत. त्यापैकी नवघर-माणिकपूर, वसई पारनाका, तुळींज आणि विरार येथे पालिकेची चार वाचनालये आहेत. उर्वरित १४ ग्रंथालये खासगी संस्थांची आहे. लोकांनी अधिकाअधिक वाचन करावे, दर्जेदार साहित्य त्यांना उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेने ग्रंथालये टिकवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी सर्व खासगी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान त्यांच्या श्रेणीनुसार दिले जाणार  भर दिला आहे. त्यासाठी सर्व खासगी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान त्यांच्या श्रेणीनुसार दिले जाणार आहे ‘अ’ दर्जाच्या ग्रंथालयांना दीड लाख रुपये, ‘ब’ वर्गाला १ लाख रुपये आणि ‘क’ वर्गाच्या ग्रंथालयांना ५० हजार रुपये वार्षिक अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय महापालिकेने त्यांच्या वाचनालय व्यवस्थेसाठी तब्बल पाच कोटी २३ लाख एवढय़ा भरघोस रकमेची तरतूद केली आहे. साहित्यिक पुस्तके, नियतकालिकांबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा पुस्तके मिळावी यासाठी महापालिकेने सर्व वाचनालयांना राज्य लोकसवा आयोगाची सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.

महापालिकेची ग्रंथालये हायटेक

महापालिकेची एकूण चार ग्रंथालये आहेत. वाचकांना या ग्रंथालयात जाऊन पुस्तक आहे का हे विचारावे लागते. वाचकांनी मागणी केल्यावर कर्मचारी पुस्तक शोधतात. त्यामुळे वेळ जातो आणि ही प्रक्रियाही किचकट आहे. ग्रंथालयातील सर्व व्यवस्था जुनी आणि पारंपरिक आहे. ग्रंथालयामध्ये नवीन पुस्तके आल्याची माहिती वाचकांना नसते. त्यामुळे आता पालिकेने आपली सर्व ग्रंथालये अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खास सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. पालिकेच्या सर्व वाचनालयात किती पुस्तके आहेत, किती नवीन पुस्तके आली ही सर्व माहिती अ‍ॅपवर वाचकांना मिळणार आहे. कुठल्या ग्रंथालयात हव्या असलेल्या पुस्तकांच्या किती प्रती आहेत ते समजू शकणार आहे. एखादे पुस्तक कुठल्या वाचकाने नेले, ते परत करण्याची तारीख काय हे ग्रंथपालांना एका क्लिकवर समजणार आहे. कुणी पुस्तक परत केले नसेल तर त्या वाचकांना लगेच एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे. ग्रंथालयातील सर्व सदस्यांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुपद्वारे जोडले जाणार आहे.

Story img Loader