ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोडी कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी तसेच बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग या दोन प्रकल्पांच्या कामात २७६७ वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी १९५५ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे तर, ८१२ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या कामासाठी पालिकेने ठेकेदार नियुक्त करण्याकरीता निविदा काढली आहे. मात्र, हे पुनर्रोपण कुठे केले जाणार आहे आणि कोणत्या प्रजातीची वृक्ष आहेत, याबाबत महापालिका प्रशासनाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.

घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या भागातील नागरिकांच्या वाहतूकीसाठी घोडबंदर हा एकच मार्ग आहे. याच मार्गावरून येथील नोकरदार वर्ग मुंबई, वसई, ठाणे, भिवंडीच्या दिशेने प्रवास करतो. शिवाय, या मार्गावरून गुजरात आणि जेएनपीटी बंदराच्या दिशेने दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. या वाहतूकीमुळे वाहतूक कोंडी होत असतानाच, याठिकाणी मेट्रो मार्गिका उभारणीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यामुळे घोडबंदर मार्ग अरुंद झाल्याने कोंडीत वाढ झाली आहे. हि समस्या सोडविण्यासाठी घोडबंदरचा मुख्य मार्ग आणि त्यालगतचे सेवा रस्ते जोडून प्रत्येकी चार-चार अशा एकूण आठ मार्गिकांचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही महिन्यांपुर्वी घेतला असून त्याचे कामही प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामामध्ये मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या मध्यभागी असलेले तब्बल २ हजार १९६ वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी केवळ ५४९ वृक्षांचे पुर्नरोपण होणार आहे.

उर्वरित १ हजार ६४७ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे महापालिकेला दिला होता. त्यास पालिकेने मान्यता देऊन या कामासाठी निविदाही काढली आहे. वाहतूक कोंडीग्रस्त घोडबंदर रस्त्याला पर्यायी असा ठाणे खाडीकिनारी मार्ग उभारण्यात येणार आहे. खारेगाव ते गायमुख असा १३.४५ किमी लांबीचा खाडीकिनारी मार्ग उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या मार्गाच्या कामातही ५७२ वृक्ष बाधित होणार आहेत. यापैकी ३०९ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे तर, २६३ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या प्रस्तावालाही ठाणे महापालिकेने मान्यता दिली असून या कामासाठी पालिकेने निविदा काढली आहे.

कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प तसेच बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग या दोन्ही प्रकल्पात बाधित ठरणारे वृक्ष तोडणे आणि काही वृक्षांचे पुनर्रोपण करणे अशी कामे केली जाणार असून या कामांचा खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत केला जाणार आहे. तसेच वृक्षांचे पुनर्रोपण हे परिसरातच केले जाणार आहे. मधुकर बोडके उपायुक्त, ठाणे महापालिका

Story img Loader