कल्याण : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाने बाधित होत असलेल्या संतवाडीमधील ६० रहिवाशांना ठाकुर्ली खंबाळपाडा भोईरवाडीमधील केंद्र, राज्य सरकारच्या निधीतून उभारलेल्या शहरी गरीबांसाठी घरे योजनेतील इमारतीत (बेसिक सर्व्हेिसेस फाॅर अर्बन पुअर) घरे देण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिकेने घेतला आहे.संतवाडीमधील ६० रहिवाशांना सोडत पध्दतीने खंबाळपाडा भोईरवाडीतील ६० घरांचा ताबा देण्याची पत्रे पालिकेकडून देण्यात आली. स. वा. जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे फाटक ते ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकापर्यंत कल्याण डोंबिवली पालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय दहा वर्षापूर्वी घेतला.
या ठिकाणी पूल न बांधता जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे फाटक ते ९० फुटी रस्ता म्हसोबा चौकापर्यंत रस्ता बांधण्यात यावा. यामुळे कमीत कमी लोकांच्या रहिवाशांचे घरांचे नुकसान होईल. रस्ते मार्गामुळे स्थानिकांना याठिकाणी लहानमोठे व्यवसाय करता येतील, अशी भूमिका भाजपचे चोळेगाव प्रभागाचे तत्कालीन माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी घेतली होती.
परंतु, राजकीय दबावातून प्रशासनाने स. वा. जोशी शाळा ते म्हासोबा चौका दरम्यान उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेतला. हे काम एमएमआरडीए करत आहे. पुलामुळे ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील संतवाडीमधील ६० कुटुंब आणि लगतच्या म्हसोबा नगर झोपडपट्टीतील २८ कुटुंब बाधित झाली. या ८८ कुटुंबीयांचे योग्य जागेत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या घरांचा ताबा देणार नाही अशी भूमिका रहिवाशांनी घेतली होती.
दरम्यानच्या काळात म्हसोबानगरमधील झोपडपट्टीचा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) बेमालुमपणे एका विकासकाने आपल्या गृहसंकुलासाठी वापरला. त्यामुळे म्हसोबानगर झोपडपट्टीतील २८ कुटुंबीयांचे पुनर्वसन संबंधित विकासकाने करावे, अशी भूमिका आता पालिका प्रशासनाने घेतली आहे.बाधितांंच्या घरासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, बाजीराव अहेर, गिरीश झिगोलिया, रामचंद्र पटेकर, रामचंद्र दपडे, इंगलास शर्मा, रफिश शेख यांनी पाठपुरावा केला. ठाकुर्ली उड्डाण पूल ते म्हासोबानगर चौकापर्यंतचे काम निधी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे मागील सहा वर्षापासून रखडले आहे. यापूर्वी माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी केलेली रस्ते मार्गाची मागणीच योग्य होती, अशी चर्चा स्थानिक रहिवासी करत आहेत.
ठाकुर्ली पूल बाधित संतवाडीतील ६० रहिवाशांना सोडत पध्दतीने घरांची ताबा पत्रे देण्याची प्रक्रिया पार पडली आहे. म्हसोबानगरमधील २८ रहिवाशांंच्या पुनर्वसनाबाबत नगररचना विभाग आणि विकासकाने सामंजस्याने योग्य निर्णय घेतला की त्याची योग्य ती कार्यवाही फ प्रभागातून केली जाईल.हेमा मुंबरकर साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.
अनेक वर्ष हक्काच्या घरासाठी संंघर्ष केल्यानंतर मनासारख्या ठिकाणी रहिवाशांना हक्काची घरे मिळाली आहेत. आमदार, खासदार, स्थानिक पदाधिकारी यांचे यासाठी खूप सहकार्य मिळाले. बाजीराव अहेर बाधित रहिवासी.