दरदिवशी १३ लाखांचा दंड वसुल करण्याचा इशारा
ठाणे : ठाणे महापालिकेने हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कचरा प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर पालिका प्रशासनाने डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३० सप्टेंबरच्या मुदतीत हा प्रकल्प सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या ठेकेदाराला पालिका प्रशासनाने नोटीस बजावली असून त्यात २० ऑक्टोबरनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा नेण्यात आला नाही तर, दरदिवशी १३ लाखांचा दंड वसुल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेने हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कचरा प्रकल्पास ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होऊ लागला असून हा प्रकल्प बंद करण्यासाठी मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी कचरावाहू वाहने रोखून धरली होती. या आंदोलनानंतर ठाणे महापालिका मुख्यालयात सोमवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आमदार पाटील यांच्यासह ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत कचराभुमी बंद करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला होता. अखेर २५ ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले. या आश्वासनानंतर पालिका प्रशासनाने डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होता. परंतु अद्यापही हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. यामुळे भंडार्ली येथील प्रकल्प बंद करणे शक्य होत नसून यामुळे स्थानिकांच्या रोषाला पालिकेला सामोरे जावे लागत आहे. डायघर कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वीजेचा रोहीत्र बसविण्यात येणार होता. तो चार्जिंगवर चालणार आहे. परंतु त्याच्या चार्जींगसाठी वीज जोडणी मिळत नसल्यानेही काहीसा विलंब होत आहे. तसेच इतरही काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु या सर्व कामाची जबाबदारी ठेकेदाराची सुद्धा होती. त्यामुळे ठेकेदारा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात २० ऑक्टोबरनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा नेण्यात आला नाही तर, दरदिवशी १३ लाखांचा दंड वसुल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.