बदलापूर: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत किसन कथोरे यांच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असून भाजपने कथोरे यांना तिकीट दिल्याने त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांच्यासह कथोरे यांच्याविरुद्ध आघाडी उघडणाऱ्या अनेकांना धक्का दिला आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे भाजपाकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. भाजपने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात मुरबाड विधानसभा मतदारसंघातून किसन कथोरे यांचे नाव निश्चित झाले. दरम्यान यापूर्वी किसन कथोरे पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही कथोरे यांच्याविरुद्ध जुन्या जाणत्या भाजप पदाधिकाऱ्यांची आघाडी उभी केली होती. तसेच कथोरे यांना, हिम्मत असेल तर अपक्ष लढून आपली ताकद दाखवा असे आव्हानही पाटील यांनी उघडपणे दिले होते. त्याचवेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, मुरबाड ग्रामीण मधून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी कथोरे यांना आव्हान देत मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंपुढे मोठा पेच, भिवंडीतील पदाधिकारी रजीनामा देत बंडाच्या तयारीत, मविआतील धुसफूस चव्हाट्यावर?
या पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधामुळे किसन कथोरे शरद पवारांच्या गटात जाणार असल्याची एक मांडणी केली जात होती. हीच मांडणी करत शिवसेनेतील काही इच्छुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मुरबाड विधानसभा मतदारसंघात तयारी करण्यासाठी आदेश द्या, अशी विनंती केली होती . मात्र रविवारी भाजपने पहिल्याच यादीत आमदार किसन कथोरे यांचे नाव जाहीर केल्याने भाजपने सर्वांना स्पष्ट उत्तर दिल्याचे बोलले जाते आहे. पहिल्या यादीतील किसन कठोर यांच्या नावामुळे पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच भाजपने कथोरे यांच्या पक्षातील विरोधकांना थेट उत्तर दिल्याचे बोलले जाते.
© The Indian Express (P) Ltd