बदलापूरः बदलापूर शहर हे मुंबई महानगर प्रदेशात समाविष्ट आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पांचा आणि निधीचा ओघ पुढेच जातो आहे. त्यामुळे आम्हाला एमएमआरमध्ये सावत्रपणाची भावना वाटते. त्यामुळे पाच वर्षांत आमच्यावर झालेला अन्याय दूर करा, अशी मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कथोरे यांचा रोख नेमका कुणावर होता, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

बदलापूर शहराच्या पश्चिमेला उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणापूर्वी आमदार किसन कथोरे यांनी आपल्या भावना मांडल्या. यावेळी शहरातील विविध प्रकल्पांना निधी देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र हे करत असताना त्यांनी मुंबई महानगर प्रदेशात असूनही सावत्र असल्याची भावना जाणवते असे वक्तव्य कथोरे यांनी केले. आम्ही एमएमआरमध्ये आहोत. पण प्रकल्पांचा आणि निधीचा ओघ पुढेच जातो असे वाटते. आम्हाला स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प दिला पण निधी मिळाला नाही. आम्ही समांतर पूलाची मागणी केली आहे. आम्ही गेल्या पाच वर्षात धावत होतो. शहरात पूर्व पश्चिम प्रवासाठी सध्या एकच पूल आहे. एका नव्या पुलाची निविदा झाली पण त्याचेही कार्यादेश दिले नाहीत. पूल झाल्याशिवाय आम्हाला दिलासा मिळणार नाही, असे कथोरे म्हणाले. कांजुरमार्ग – बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पाला मंजुरी मिळाली. पण ब्रेक लागला आहे. आम्हाला पश्चिम मुंबईत जायला पर्याय नाही. मेट्रो बनल्यास आम्हाला मोठा दिलासा मिळेल, असेही कथोरे म्हणाले. त्यामुळे पाच वर्षांत आमच्यावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे, अशी तुम्हाला विनंती आहे असेही कथोरे यावेळी म्हणाले.

कथोरे यांच्या वक्तव्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे प्रमुख गेल्या काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे नेमका अन्याय कुणामुळे झाला, असा प्रश्न आता चर्चिला जातो आहे. निधीचा ओघ नेमका कुठे गेला आणि कथोरे यांचा रोख नेमका कुणाकडे होता, असाही प्रश्न विचारला जातो आहे. त्यामुळे कथोरे यांच्या विनंतीने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Story img Loader