बदलापूर: मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असतानाच सोमवारी किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक शिवसैनिकांचा निर्णय बदलण्यासाठी ही भेट होती का अशीही चर्चा रंगली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे ते निवडणुकीपूर्वीच विद्यमान आमदार किसन कथोरे यांना मोठे आव्हान निर्माण करण्यात आले आहे. यात स्वपक्षीय भाजपासह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात राजकीय पक्षांचे शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्री शिंदे, संजय केळकर, नजीब मुल्ला, केदार दिघे, संदीप पाचंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

बदलापूर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. तसेच आपण अपक्ष उमेदवारी दाखल करू असेही संकेत दिले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तेच आमदार किसन कथोरे यांनी म्हात्रे यांचे निकटवर्तीय असलेले आणि बदलापूर शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख तेजस म्हसकर यांचा भाजपात प्रवेश घडवून आणला. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार किसन कथोरे यांनी भाजपातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेचे प्रमुख माजी नगरसेवक अनुपस्थित दिसले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना शिवसैनिकांची अस्वस्थता बोलून दाखवली.

हेही वाचा >>> Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड शरद पवार गटातील नेत्याशी भिडले, माध्यमांसमोर हमरीतुमरी; अंतर्गत वाद चव्हाट्यावर, VIDEO व्हायरल

शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आम्हाला उत्तर द्यावेच लागेल, अशी प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी दिली होती. एकीकडे महायुतीतील शिवसेना हा महत्त्वाचा घटक पक्ष किसन कथोरे यांच्या विरुद्ध उभा राहतो की काय असा प्रश्न आहे. त्यातच शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला कथोरे यांनी भाजपात प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेत कथोरे यांचा प्रचार करायचा की नाही याबाबत एक वाक्यता नाही. स्थानिक पातळीवर महायुतीत अशी विरोधाभासी परिस्थिती असताना सोमवारी आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथे निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार कथोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र स्वतः किसन कथोरे यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून या भेटीची माहिती आणि फोटो पोस्ट केला. स्थानिक पातळीवर शिवसैनिकांना महायुतीचा धर्म पाळत प्रचारात सहभागी होण्यासाठी समज देण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता या भेटीनंतर शिवसेना शहर शाखेचे स्थानिक पदाधिकारी आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.