बदलापूर: अठराव्या शतकात बांधण्यात आलेला आणि मुरबाड मध्ये तत्कालीन महसूल विभागाचा कारभार हाकताना महत्त्वाचा असलेला झुंजारराव वाडा शुक्रवारी आगीत जळून खाक झाला. हा वाडा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होता. २५० वर्षे जुना वाडा जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मुरबाड तालुक्यात सरळगावजवळील नेवाळीपाडा येथे असलेला २५० वर्ष जुना झुंजारराव वाडा शुक्रवारी आगीत जळून खाक झाला. सुदैवाने या यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र वाडा जळाल्याने मुरबाडमधील १८ व्या शतकातील ऐतिहासीक वास्तू नष्ट झाली आहे. जयराम झुंजारराव यांनी १८ व्या शतकात हा वाडा बांधला.

शाहू महाराजांनी या वाड्याला भेट दिली होती. तसेच तत्कालिन महसुल विभागाचा कारभार या वाड्यातून होत होता. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना मुरबाडला महसुल गोळा करण्यासाठी येत असत. त्यावेळी त्यांचाही मुक्काम याच वाड्यात असायचा. हा ऐतिहासिक ठेवा जळत असताना मुरबाड आणि राज्यात हळहळ व्यक्त केली जात होती.