बदलापूर : लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात आगरी विरुद्ध आगरी अशा थेट लढतीत कुणबी मतांच्या विभाजनाचा मोठा फटका भाजप उमेदवार कपिल पाटील यांना बसला होता. जीजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांच्याकडे कुणबी मतांचे ध्रुवीकरण झाल्यामुळे शहापूर तसेच मुरबाड तालुक्यातही भाजपचे गणित चुकले. मुरबाड विधानसभेत यंदा विद्यमान आमदार किसन कथोरे आणि सुभाष पवार अशा दोन कुणबी उमेदवारांमधील लढत रंगतदार अवस्थेत आली आहे. या दोन कुणबी उमेदवारांसाठी या भागातील आगरी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. पाटील यांच्या पराभवाने मोठा आगरी समाज दुखावला. त्या पराभवाचे खापर पाटील यांनी किसन कथोरे यांच्यावर फोडले होते. त्यामुळे ही मते या निवडणुकीत निर्णायक ठरु लागली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर हा शहरी भाग, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याचा ग्रामीण भाग तसेच मुरबाड तालुक्याचा भाग समाविष्ट आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाची मते अधिक आहेत. त्याचवेळी बदलापूरसह आसपासच्या भागात तसेच कल्याण आणि अंबरनाथच्या काही भागात आगरी मतेही निर्णायक ठरत असतात. लोकसभा निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यात थेट लढत होती. हे दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या लढतीत जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी कुणबी उमेदवाराच्या रूपाने रंगत आणली होती. लोकसभेतील भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुणबी मते आपल्याकडे वळवण्यात सांबरे यशस्वी झाले होते. त्याचा फटका भाजपच्या कपिल पाटील यांना बसला. निकालानंतर कपिल पाटील यांनी जातीवर मतदान झाल्याचा आरोपही केला होता. सोबतच पराभवाला आमदार किसन कथोरे यांनाही दोषी धरत त्यांच्यावर टीका केली होती. या सर्व निकालानंतर आगरी आणि विशेषतः सत्तेतील आगरी समाज दुखावला होता. बाळ्यामामा म्हात्रे आगरी असले तरी आगरी समाज कपिल पाटील यांच्या पाठिशी होता. त्यांचा पराभव आगरी समाजासाठी धक्कादायक होता, अशी चर्चा समाजात होती. त्यामुळे मुरबाडच्या रिंगणात आगरी समाजाची अस्मिता पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.

हेही वाचा – कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

हेही वाचा – महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरे

कुणबी उमेदवारांची आगरी समाजाला हाक

सध्याच्या घडीला मुरबाडमध्ये किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार अशी थेट लढत असून हे दोन्ही उमेदवार कुणबी समाजातून येतात. मतदारसंघात प्रभावी आगरी उमेदवार नाही. त्यामुळे अशा स्थितीत मतदारसंघातील कुणबी मतांचे विभाजन होणार हे निश्चित मानले जात आहे. परिणामी आगरी मते कुणाच्या बाजून वळतात त्यावर मतदारसंघाचा निकाल अवलंबून असल्याचे बोलले जाते. कपिल पाटील यांचा पराभव, त्यामुळे आगरी समाजात उद्भवलेली नाराजी, शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी मुरबाडच्या प्रचारातून घेतलेली माघार अशा काही मुद्द्यावर ही नाराजी कुणाच्या पथ्यावर पडते आणि कुणाला फायदेशीर ठरते हे पाहणे महत्वाचे रहाणार आहे. बदलापूरचे वामन म्हात्रे यंदा किसन कथोरे यांच्यासोबत नाहीत. स्थानिक राजकारणात कथोरे यांना साथ देणे योग्य ठरणार नाही अशी ठाम भूमीका म्हात्रे यांनी समर्थकांपुढे मांडल्याची चर्चा आहे. कपील पाटील समर्थकही कथोरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे या नाराजीतून मार्ग काढत आगरी-कुणबी मतांची मोट बांधण्याचे आव्हान कथोरे यांना पेलावे लागणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murbad kisan kathore subhash pawar kunbi candidate ssb