बदलापूर: ग्राहकाच्या मीटरचे रीडिंग न घेताच बिल पाठवणे, तसेच त्यासंबंधीच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करणे आणि सुरळीत वीज पुरवठा देण्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महावितरणच्या एका बड्या अधिकाऱ्याला ग्राहक तक्रार निवारण मंचाने जोरदार दणका दिला आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मुरबाड येथील महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात संबंधित अधिकाऱ्याकडून दंडापोटी १० हजार रुपये वसूल केले आहे.
वीज पुरवठ्यावरून कायम नागरिकांच्या रागाचे लक्ष्य ठरणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा आणि बड्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार दोन तक्रारींवरून उघडकीस आला आहे. मुरबाड जवळील खंदारे गावातील दिलीप करमरकर यांनी आपल्या वीज मीटरची रीडिंग न घेताच बिल दिले जात असल्याची तक्रार केली होती. तर पोटेगाव येथील शर्मिला हाब्दे यांनी पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा केला जात नसल्याची तक्रार केली होती. या दोन ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन मोबाईल अॅपवर तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींना दाद न मिळाल्याने या दोन्ही ग्राहकांनी महावितरणच्या कल्याण येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. ग्राहक तक्रार निवारण केंद्राने याप्रकरणी केलेला तपास आणि सुनावण्यानंतर मुरबाडमधला महावितरणचा बेमालूम कारभार उघड झाला.
हेही वाचा – घुसखोर बांगलादेशींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
महावितरणच्या अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा
महावितरणचे ग्राहक दिलीप करमकर यांनी यंदाच्या जुलै महिन्यात केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे कृषी जोडणीचे मीटर असून त्यांना दीर्घकाळापासून एकसारखेच वीज देयक येत होते. तसेच, मीटर निरीक्षणासाठी कोणताही कर्मचारी त्यांच्याकडे येत नव्हता. यावर पर्याय म्हणून स्वतः मीटरचे फोटो काढून महावितरणच्या मोबाईल अॅपवर टाकले होते. मात्र, तरीदेखील एकसारखेच बील त्यांना येत होते. यावर त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीवर तात्काळ दुसऱ्या दिवशी तुमचे मीटर बदलले गेले आहे आणि त्यानुसार वीज आकारली जाणार असल्याचा प्रतिसाद येत ही तक्रार बंद केल्याचे सूचित केले गेले. अखेर असंतुष्ट करमरकर यांच्या प्रकरणाची दखल महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण विभागाने घेत त्यावर सुनावण्या घेतल्या. या सुनावण्यांमध्ये धक्कादायक माहिती उघडकीस आली. ऑनलाईन तक्रार सोडविण्यात महावितरणला अपयश आल्याचे त्यात स्पष्ट झाले. हे अपयश का आले? याची विचारणा केल्यावर महावितरणचे मुरबाडचे उपविभागीय अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच, त्यांनी या प्रकरणाच्या पुढील सुनावण्यांची दखल न घेता अनुपस्थित राहिल्याचे निरीक्षण नोंदवले. अखेर त्यांच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश निकालात देण्यात आले.
ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या या प्रकरणातील निकालानुसार, ग्राहक दिलीप करमरकर यांना नाहक त्रास झाला आहे. त्यांचे वीज देयक हे महावितरण, मुरबाडच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावे. यासाठी महावितरणच्या कल्याण मंडळ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला १० हजाराचा दंड करावा. तसेच ग्राहक करमरकर यांचे वीज देयक सुरळीत व मीटरवरील निरीक्षणानुसार यावे याची काळजी घ्यावी. दुसऱ्या प्रकरणातही महावितरणच्या कल्याण येथील ग्राहक तक्रार निवारण विभागाचे अध्यक्ष गिरीश महाजन, सदस्य सचिव ज्ञानेश पानपाटील, सदस्या मनिषा कुलकर्णी यांच्या समितीने हे दोन्ही निकाल जारी केले आहेत.
ऑनलाइन तक्रारींवर खोटा तोडगा
दरम्यान, या दोन्ही प्रकरणांमुळे महावितरणची मोबाईलवरील ऑनलाईन तक्रार निवारण व्यवस्था सदोष असल्याचे उघड होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करणे किंवा वीज देयके नियमित आकारानुसार देणे यांसारख्या शुल्लक तक्रारी विना पडताळणी निकाली काढण्यात आल्याचे या प्रकरणांवरून उघड झाले आहे. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे महावितरणची ऑनलाईन तक्रार व्यवस्था ग्राहकांचीच डोकेदुखी वाढवत असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा – मुंबई नाशिक महामार्गावर अपघात, ठाण्यात वाहनांच्या रांगा; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल
ग्राहक दिलीप करमरकर यांच्या प्रकरणात संबंधित उपविभागीय अधिकारी केतन थत्ते यांच्या वेतनातून दहा हजार रुपये मंचाच्या आदेशानुसार कापण्यात आले आहेत. पुढील प्रक्रिया सुरू आहे. तर दुसऱ्या प्रकरणातही ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या आदेशाचे पालन केले जाते आहे. अशा प्रकारच्या दुर्लक्षाच्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी कर्मचारी वर्गाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. – आनंद काटकर, कार्यकारी अभियंता, बदलापूर विभाग महावितरण.