‘हिस्ट्री’ वाहिनीच्या ध्वनिचित्रफितीमुळे मुरबाडचे फांगणे गाव जगाच्या नकाशावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण आयुष्य अशिक्षितपणात गेले असले तरी उर्वरित आयुष्यात साक्षरतेची कास धरत किमान अक्षरओळख व्हावी, या भावनेतून गेल्या वर्षी सुरू झालेली आजीबाईंची शाळा आता संपूर्ण देशासह परदेशातील नागरिकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. विविध प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संस्थांमुळे आजीबाईंच्या शाळेची ख्याती सातासमुद्रापार पसरली असून मुरबाडचे फांगणे गावाने आता जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच ‘हिस्ट्री’ वाहिनीने तयार केलेल्या शाळेविषयीच्या माहितीपटाला जगभरातून मोठय़ा प्रमाणात पसंतीची पावती मिळाली.

आयुष्याच्या नव्वदीत असलेली ज्येष्ठांची पिढी ही त्यांच्या शिक्षणाच्या वयात शिक्षणापासून दूर होती. त्याकाळी अनेक कारणांनी शब्दांचे धडे गिरवता न आल्याने अनेकांना आपले आयुष्य अशिक्षित म्हणूनच संपवावे लागले. मात्र आयुष्य अशिक्षित म्हणून गेले तरी शेवटच्या टप्प्यात का होईना वृद्धांना शिक्षणाचा गंध मिळावा. त्यांना किमान लिहिता वाचता यावे, यासाठी मुरबाडपासून जवळच असलेल्या फांगणे गावात नवा प्रयोग सुरू झाला. फांगणेचे शिक्षक योगेंद्र बांगर, ‘केै. मोतीलाल दलाल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून दिलीप दलाल यांनी साठी ओलांडलेल्या आजीबाईंसाठी ८ मार्च २०१६ रोजी आजीबाईंची शाळा सुरू केली. सुरुवातीला २१ आजीबाईंनी या शाळेत प्रवेश घेतला होता. गणेशोत्सवाच्या काळात त्यातील एका आजीबाईंचे देहावसान झाले. मात्र शाळा पुन्हा सुरू राहिली. याच काळात आजीबाईंनी राखी बनवणे, भाज्या पिकवणे अशा कामांमधूनही आपले योगदान दिले. वर्षभरातच या उपक्रमांमुळे आजीबाईंची शाळा सातासमुद्रापार पोहोचली असून  सध्या फांगणे गावात देशी-विदेशी पाहुणे या शाळेला भेट देण्यासाठी येत आहेत.

हिस्ट्री’ वाहिनीच्या ध्वनिचित्रफितीला वीस लाखांहून अधिक जणांनी भेट दिली आहे. तर बीबीसी, दूरदर्शन, सीएनएन अशा अनेक नामांकित वाहिन्यांनीही फांगणेला भेट देण्यासाठी वेळ मागितली आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशातील सामाजिक संस्था आणि देशातील ‘टाटा’ सामाजिक संस्थाही या शाळेच्या भेटीसाठी रांगेत आहेत.

-योगेंद्र बांगर, शाळा प्रमुख.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murbad phangane village now on the world map due to school for old women
Show comments