लोकसत्ता प्रतिनिधी
बदलापूर : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर आज सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये झाली आहे. मुरबाडमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हा यंदाच्या मोसमातील विक्रमी तापमान असल्याचे म्हटले जाते आहे. त्या खालोखाल डोंबिवली जवळील पलावा परिसरात ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा या शहरांनी ४० अंश सेल्सिअसचा टप्पा रविवारी ओलांडला.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्ण दिवस असतील आणि उष्णतेची लाट जाणवेल असा अंदाज नुकताच हवामान खात्याने वर्तवला होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानात वाढ दिसून आली आहे. त्यामुळे उष्णतेची लाट जाणवते आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याचे दिसून आले होते. मुरबाडमध्ये आणि डोंबिवली जवळील पलावा येथे ४० अंश सेल्सिअस तापमान ओलांडले जात असल्याचे खाजगी हवामान अभ्यासाकांनी नोंदवले होते. शनिवारी उष्णतेच्या लाटेचा अंदाज दिल्यानंतर रविवारीच तापमानात मोठी वाढ दिसून आली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ४२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हे राज्यातील सर्वाधिक तापमान असल्याची माहिती खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. त्या खालोखाल शेजारच्या कर्जत तालुक्यात ४१.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर पलावा येथे ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद खाजगी हवामान अभ्यासकांनी केली आहे.
जिल्ह्यात उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा या शहरांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी जिल्ह्याचे सरासरी तापमान हे ३९ अंश सेल्सिअस असल्याचे खाजगी हवामान अभ्यासाकांनी नोंदवले आहे.
ठाणे आणि मुंबई महानगर परिसरात मुरबाड तालुक्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मात्र राज्यात कोकणात चिपळूण येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. तर उष्णतेची लाट आणखी दोन ते तीन दिवस जाणवेल असेही मोडक म्हणाले.
मुंबई ३४.८
विरार ३६.६
पालघर ३८.४
नवी मुंबई ३८.९
तलासरी ३९.४
ठाणे व बदलापूर ३९.८
पनवेल ३९.९
खारघर ४०.२
मनोर ४०.३
डोंबिवली ४०.६
मुंब्रा ४०.७
कल्याण ४०.८
उल्हासनगर ४०.९
पलावा ४१.३
कर्जत ४१.७
मुरबाड ४२.३